मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि राधेश्याम मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधार्यांना धारेवर धरले होते. यावेळी सत्ताधार्यांना बोलू दिले जात नाही, असा आरोप करत विधानपरिषदेत सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या आमदारांनी सभात्याग केला. गिरीष बापट यांनी हा आरोप करत यापुढे कामकाजात सहभागी होणार नसल्याचे म्हटले. सत्ताधार्यांच्या सभात्यागानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात सत्ताधार्यांनी सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उत्तर देता येत नसल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विधानपरिषदेतून पळ काढावा लागला, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
बहुमताच्या जोरावर दादागिरी
प्रकाश महेता, राधेश्याम मोपलवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी धारेवर धरल्याने सरकारची कोंडी झाली. शेवटी दुपारनंतर सत्ताधार्यांनी विधानपरिषदेतून सभात्याग केला. मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांना बोलू द्यायचे नाही, असा लोकशाहीविरोधी पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. सभापती आणि उपसभापतींनीही यावर विचार करण्याची गरज आहे. पाशवी बहुमताच्या जोरावरील दादागिरी सहन करणार नाही, अशा शब्दात गिरीश बापट यांनी विरोधकांना सुनावले.
आमच्या अरोपांवर उत्तर नाही
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रकाश महेता आणि राधेश्याम मोपलवार यांच्यावरुन आम्ही सरकारला धारेवर धरले. महेतांनी राजीनामा द्यावा आणि मोपलवार यांचे निलंबन करावे, अशी आमची मागणी होती. पण भ्रष्टाचाराच्या आरोपांवर उत्तर नसल्याने भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी पळ काढला. लोकशाहीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असेल, असेही मुंडे म्हणाले.
येथे चर्चा करणे अपेक्षित
विधानपरिषदेत नियमाप्रमाणे कामकाज होत नाही. गेल्या 7 दिवसांत एकही विधेयक संमत झालेले नाही. हे ज्येष्ठांचे सभागृह असून इथे चर्चा करणे अपेक्षित आहे. हे कायदेमंडळ आहे. पण विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधार्यांना बोलूच देत नाही.
चंद्रकांत पाटील, सभागृह नेते