निमंत्रण पत्रिका, हार, फुले बंद करुन आम्ही पैशांची बचत करत असल्याची दवंडी उगीचच
सभागृह नेत्याच्या दालनात नवेकोरे सोफे : लाखो रुपयांचा चुराडा
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी निमंत्रण पत्रिका, हार, फुले बंद करुन आम्ही पैशांची बचत करत असल्याची दंवडी पिटवीत आहेत. तर, दुसरीकडे सभागृह नेत्याच्या दालनासाठी लाखो रुपयांच्या नवीन सोफ्यांची खरेदी करण्यात आली आहे. या सोफ्यांसाठी लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे. त्यामुळे भाजपच्या बचतीच्या धोरणाची खिल्ली उडविली जात आहे.
अनावश्यक खर्च म्हणून ठराव
भाजपची पहिल्यांदाच सत्ता आल्यानंतर पहिल्या वर्षात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. पहिल्या स्थायी समितीच्या कामाचे जेवढे कौतुक झाले. तेवढेच आरोप देखील झाले. त्यानंतर दुसर्या वर्षी नवीन स्थायी समिती अस्तिवात आल्यानंतर त्यांनी काही पैसे बचतीचे निर्णय घेतले. त्याचे मोठे श्रेय देखील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतले. जनसंपर्क विभाग, क्रीडा व सास्कृतिक विभाग व अन्य विभागाकडून महापालिकेने होणारे विविध कार्यक्रम व भूमिपूजन, उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांसाठी निमंत्रण पत्रिका छापल्या जात होत्या. यावर मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होत असल्याचे सांगत स्थायी समितीने निमंत्रणपत्रिका छापणे बंद करण्याचा ठराव केला. त्याची अमंलबजावणी देखील सुरु केली.
निवृत्तांचे स्मृतीचिन्हही बंद
प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताला देण्यात येणारा पुष्पगुच्छ देखील बंद करण्यात आला. त्याचबरोर निवृत्त होणा-या कर्मचा-यांना देण्यात येणारे स्मृतीचिन्ह देखील बंद करण्यात आले होते. तथापि, कर्मचारी महासंघाने स्मृतीचिन्ह देण्याची मागणी केली. त्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. आम्ही यातून करदात्यांच्या पैशांची बचत करत असल्याचे सत्ताधार्यांनी सांगितले. तर, दुसरीकडे सभागृह नेत्याच्या दालनात बसविण्यासाठी लाखो रुपयांच्या नवीन सोफ्यांची खरेदी करण्यात आली आहे.
महापौरांच्या अँटी चेंबरवर चुराडा
पालिका मुख्यालयाच्या तिसर्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेते, विधी समिती, क्रीडा, महिला व बालकल्याण आणि शहर सुधारणा समितीचे कार्यालय आहे. भाजपची सत्ता येताच सर्वप्रथम स्थायी समितीचे दालन प्रशस्त करण्यात आले. तसेच महापौरांच्या अॅन्टी चेंबरवर देखील लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. आता त्यानंतर शुक्रवारी सभागृह नेत्याच्या दालनात नवेकोरे सोफे बसविण्यात आले आहेत. यावर लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे. त्यामुळे भाजपच्या पैसे बचतीच्या धोरणाची खिल्ली उडविली जात आहे.