सत्ताधार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे 10 कोटींचा निधी गेला परत

0

भोर । जिल्हा परिषद आणि पंचायत समीतीमधील सत्ता ही लोक हितासाठी न राबवता केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठीच वापरल्याचे दिसून येते. मागील पदाधिकारी आणि सत्ताधार्‍यांच्या राजकीय नाठाळपणामुळे भोर तालुक्यातील विकासकामांचा 10 कोटींचा निधी वापराविना परत गेला आहे, असे भोर पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहीती दिली.

भोर पंचायत समितीच्या कार्यालयाकडील 2015 ते 2016 अखर्चित लेखी अहवालनुसार मागील सत्ताधारी पदाधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळे आणि तोंडे पाहून काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे हा निधी परत गेला, मागील पंचवार्षिकमध्ये सत्ताधांर्‍यांनी मनमानी पध्दतीने कामकाज केले असून, अनेक ठिकाणी अनियमितता आणि त्रुटी आढळून येतात, असे बाठे यांनी सांगितले. असे असताना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी विकासकामांचे श्रेय लाटण्याच्या नादात अनेक गावांचे विकासाचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला.

चौकशीची मागणी
भोर तालुक्यातील मागील सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या कार्यकाळातील 10 कोटी रुपयांचा विकासकामांचा मंजूर निधी परत जात असेल तर या अपयशाला जबाबदार कोण? बेजाबदार पदाधिकार्‍यांची आणि अधिकार्‍यांची चौकशी व्हावी, अकार्यक्षमतेमुळे गेलेला निधी परत येणार का? वंचित घटकांना न्याय मिळणार का,असा सवाल भोर पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांनी केला आहे.

परत गेलेल्या निधीचा खुलासा द्या
सत्ताधार्‍यांना आणि पदाधिकार्‍यांना विकासकामे करताना भरपूर अडथळे आले असतील, पण कारणावर मात करण्यासाठीच सत्ताधारी असतात, याचा विसर त्यांना बहुदा पडला असल्यानेच असा निधी परत गेला असावा. भोर तालुक्यातील पडलेल्या आणि गळक्या शाळा, विना ग्रामपंचायत कार्यालयाची गावे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, गावातील गटारे आणि सांडपाण्याची व्यवस्था अशा एक ना अनेक समस्या डोळयासमोर असतानाही भोर तालुक्याचा विकासकामांचा निधी परत जातो आणि राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारताना दिसतात. परत गेलेल्या निधीचा खुलासा भोर तालुक्याच्या जनतेला संबंधितांनी करून द्यावा. पूर्वी झालेल्या चुकीच्या कामांना तिलांजली देऊन सर्व प्रशासन आणि सत्ता अधिकारी, पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग यांच्या साहाय्याने पंचायत समितीचा कारभार लोकाभिमुख होण्यासाठी, तसेच वंचित आणि शोषित घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाठे यांनी सांगितले.