भुसावळ : येथील नगरपालिकेतील सत्ताधारी व अधिकारी मनमानीपणे कारभार करीत असून अनेक व्यवहारांमध्ये आर्थिक घोटाळे होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तपासणी करण्याची मागणी जनाधार विकास पार्टीतर्फे करण्यात आली आहे. जनाधारच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात याचे निवेदन दिले आहे. पालिकेत अधिकारी व सत्ताधारी मनमानी कारभार करीत आहेत. पालिकेच्या झालेल्या बेकायदेशीर सभेत व स्थायी समितीच्या बैठकीत चुकीचे निर्णय घेण्यात आल्याने यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप जनाधारने निवेदनाद्वारे केला आहे.
सोयीनुसार विषय मागच्या तारखेच्या प्रोसिडींगमध्ये बेकायदेशीररित्या समाविष्ठ करण्यात येतात. यात आर्थिक घोटाळे होण्याची शक्यता असून याची चौकशी करण्यात यावी तसेच राज्य शासनाने अमृत योजनेंतर्गत शहरात ग्रीनबेल्ट विकसीत करण्यासाठी पालिकेस 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मागील सन 2016-17 या वर्षातच हा निधी प्राप्त झाला होता. या निधी अंतगर्त वृक्षलागवडीचे काम 2017-18 या वर्षात सुरु झालेले असून योजनेचा मुख्य हेतून साध्य न करता खरेदी केलेली वृक्षे अद्यापही पडून आहेत. त्यामुळे केवळ कागदोपत्री वृक्षारोपण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी जनाधारचे गटनेता उल्हास पगारे, जगन सोनवणे, नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांची उपस्थित होती.