जनआधारच्या नगरसेवकांनी मांडली पत्रपरीषदेत भूमिका
भुसावळ– सत्ताधार्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळूनच आम्ही सर्वसाधारण बहिष्कार टाकला आहे. सभेत आमच्या नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही, कचरा संकलन ठेकेदाराची मनमानी सुरू आहे, मर्जीतल्या नगरसेवकांच्या वॉर्डात कामे सुरू असल्याने शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्याची भूमिका जनआधारच्या 20 नगरसेवकांनी पत्रकार परीषदेत मांडली. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या निवासस्थानी पत्रकार परीषद झाली. जनआधारच्या नगरसेवकांना कचरा संकलन ठेकेदार संतोष ठाकूर यांचा ठेका रद्द करावा तसेच बंधारा बांधणार्या ठेकेदारालाही ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली. आगामी सभेत विरोधकांच्या प्रभागातातील कामे न झाल्यास जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला. शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्यांनी भ्रष्टाचाराला खतपाणी देणार्या विषयांना प्राधान्य दिल्याचा आरोपही करण्यात आला. युवा कार्यकर्ते सचिन चौधरी, गटनेता उल्हास पगारे, उपगटनेता जाकीर शेखसह माजी नगरसेवक जगन सोनवणे, दुर्गेश ठाकूर आदींची उपस्थिती होती.