सत्ताधार्‍यांमुळे पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्‍न प्रलंबित

0
राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांचा आरोप
पिंपरी : महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर शहरातील जनता मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहात होती. सत्ताधारी भाजप नविन काहीतरी करेल. शहराला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीकोनातून नवनविन महत्वकांशी प्रकल्प राबविले जातील, अशी आशा ठेवली होती. मात्र, दीड वर्षातच जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. केंद्राच्या संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या बैठकीत पुण्यातील विविध प्रश्‍न मार्गी लावले, परंतू, पिंपरी चिंचवड शहरातील रेडझोन, रक्षक सोसायटीचा रस्ता, डेअरी फार्मजवळील उड्डाणपुल आदी प्रलंबित प्रश्‍नावर चर्चाही केलेली नाही. त्यामुळे संरक्षण मंत्रालयास शहराचे वावडे आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शहरातील कचरा, पाणी पुरवठा, आरोग्य इत्यादी मूलभूत गरजाही व्यवस्थित पुरवू शकले नाहीत. नुसती आश्‍वासने देऊन प्रत्येक कामात भष्ट्राचार करण्याचे एकच काम भाजपा पदाधिकारी करीत आहेत. भाजप पदाधिका-यांच्या नाकर्तेपणा उघड झाला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी महाराष्ट्रातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधीत प्रलंबीत विकास कामांविषयी महत्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी पुणे विमानतळासाठी 15.84 एकर जागा हस्तांतरीत करणे, विमानतळा संदर्भात इतर मान्यता देणे, चांदनी चौक आणि एनडीए पाषाण रोडच्या परवानगी देणे आदी संबंधित कामे मार्गी लावली आहेत.
दरम्यान, त्या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधीत पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटीचा रस्ता हस्तांतरीत करणे, डेअरी फार्मचा रेल्वे उड्डाण पूलास संरक्षण विभागाकडून परवानगी मिळवणे, निगडी, यमुनानगर,तळवडे रुपीनगर, त्रिवेणीनगर तसेच भोसरी, दिघी, च-होली मधील काही भाग रेड झोनने बाधित होत आहेत. त्या बांधकामांना परवानगी दिली जात नाही. रेड झोन हद्द कमी करणेबाबत पाठपुरावा करणे आदी प्रश्‍न कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. स्थानिक भाजपाच्या कारभा-यांनी संरक्षण मंत्रालयाशी पाठपुरावा करण्यास अपयशी ठरल्याने संबंधित वरील कामे रखडली आहेत. त्यामुळे भाजप कारभा-यांचा नाकर्तेपणा दिसून आला आहे, अशी टिकाही कलाटे यांनी केली आहे