शहरतील जिजामाता चौक ते भेगडेआऴी चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या प्रश्न
सभा वृत्तांकनातील खाडाखोडीवर घेतला जोरदार आक्षेप
तळेगाव दाभाडे : शहरातील तसेच गाव भागातील जिजामाता चौक ते भेगडेआऴी चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या प्रश्नावरून सत्तारुढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तर मागील सभेच्या प्रोसिडींग (सभा वृत्तांकन) मधील लिखाणामध्ये खाडाखोड करण्यात आली होती. या खाडाखोडीवर शहर विकास सुधारणा व समितीच्या गटनेत्यांनी जोरदार आक्षेप घेऊन सभा तहकुबीचा आग्रह धरला. अखेर नगराध्यक्षांनी सभा थांबवून खाडाखोडीच्या ठिकाणी सह्या केल्या त्यानंतर या सदस्यांनी पुन्हा सभा सुरु करून दिली. नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या सभेस उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, मुख्यधिकारी वैभव आवारे व्यासपीठावर होते. सभेच्या सुरुवातीला माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
हे देखील वाचा
सभेला सुरुवात होताच माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी जिजामाता चौक ते भेगडेआऴी चौका पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणावरून मुख्याधिकारी आवारे यांना नागरिकांचे ओटे, पायर्या व बांधकाम काढून टाकल्याने जाब विचारला. याच विषयावरून विरोधी पक्षाचे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक बापूसाहेब भेगडे, संतोष भेगडे, अरुण माने, वैशाली दाभाडे यांनी आक्रमकपणे प्रशासनाच्या या गलथान कारभाराबद्दल धारेवर धरले. बांधकाम विभागाच्या रस्ते करण्याच्या ठरावाला सभागृहातील सर्व नगरसेवकांनी भुयारी गटर योजनेचे काम झाल्याशिवाय रस्त्याचे काम करू नये. तर रस्त्याचे खड्डे व गटारांची दुरुस्ती मात्र तातडीने करून घ्यावी, असे सर्वांनी सांगितले. तर एक वर्षापूर्वी केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणामध्ये रस्त्याला खड्डे पडले असल्यास सबंधीत ठेकादारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीद टाकवे. तर शहरातील कचरा व्यवस्थापना बाबत किशोर भेगडे यांनी सकाळ आणि संध्याकाळ पूर्वीप्रमाणे कचरा संकलन करण्याचा आग्रह धरला. प्रशासनाने रस्त्याच्या फुटपथावर उभारालेल्या आधुनिक कचराकुंड्या काढून टाकाव्यात अशी मागणी केली.
तळेगाव नगर परिषदेकडून नागरी दलित वस्तीमधील विकास कामाचा निधी त्या वस्तीत न वापरता दुसरीकडे वापरला जातो. या बाबत नगरसेवक अरुण माने, वैशाली दाभाडे यांनी सभेत आक्षेप नोंदविला. शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागांना सीमाभिंती घालून त्यांचे अतिक्रमणापासून सावरक्षण करावे अशी सूचना अरुण भेगडे पाटील यांनी मांडली. शहरात होत असलेले क्रीडा संकुल खाजगी विकसकास चालविण्यास न देता नगर परिषदेने ते विकसित करून गरजेप्रमाणे क्रीडा शिक्षकांची नेमणूक करून सर्वसामान्यांना परवडेल अशा पध्दतीने चालवावे.
शहरात लावलेले एलएडी दिवे व पोल यावर झालेल्या भरमसाठ खर्चावर आक्षेप घेऊन एलएडी दिवे बनविणार्या उत्पादकांना काम द्यावे असा आग्रह विरोधकांनी धरला. शासनाची पंतप्रधान आवास योजना राबविताना विलंब होत असून यामधील सदनिका स्थानिकांना प्राधान्याने देण्यात याव्यात, अशी मागणी सदस्यांनी एक मुखी केली. पंतप्रधान आवास योजनेची माहिती प्रभागामध्ये जाऊन सांगून नागरिकांचा सहभाग वाढवावा, असे संतोष भेगडे यांनी सुचविले. याशिवाय बांधकाम, पाणी पुरवठा, नगररचना, आरोग्य, विद्युत्त, भंडार, महिला बालकल्याण, शिक्षण, कार्यालय आदी विभागातील महत्वाच्या सर्व विषयांना चर्चेतून मंजुरी दिली. या सभेत उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, अरुण भेगडे, कल्पना भोपळे, अमोल शेटे, संदीप शेळके, शोभा भेगडे, विभावरी दाभाडे, हेमलता खळदे, अॅड.श्रीराम कुबेर आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला होता.