सत्तासंघर्षातून वादाचा जन्म!

0

सोलापूर । विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे यावरून सध्या सामाजिक वातावरण गढूळ झाल्याच्या पाश्‍वभूमीवर राज्यकर्त्यांनी वेळीच तोडगा न काढल्यास मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराप्रमाणेच परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. नामांतराच्या मुद्दयला विविध कंगोरे असून, सत्ताधारी भाजपमधील सत्तासंघर्षही तेवढाच कारणीभूत ठरला आहे.

सहमती घडवून आणा
नामांतराचा वाद हाताबाहेर जात असल्यास सोलापूर हेच नाव कायम ठेवले जाईल, असे सरकारने जाहीर करावे, असे मत काही जाणकरांनी मांडले आहे. सामाजिक वातावरण गढूळ होणार असल्यास सहमती घडवून आणणे हे सार्‍यांचे काम आहे. पण सारेच नेते आपला स्वार्थ साधत असल्याचे चित्र आहे.

विद्या परिषदेची सावध भूमिका
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरचा मुद्दा जेव्हा विद्यापीठाच्या विद्या परिषदेकडे संमतीसाठी गेला होता तेव्हा 28 संघटनांनी विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे, यासाठी वेगवेगळ्या नावांचा आग्रह धरला, तेव्हा एकंदरीत सामाजिक परिस्थिती लक्षात घेता 2008 साली विद्या परिषदेने नामांतराच्या मुद्दयवर सावध भूमिका घेत, विद्यापीठाला सिद्धेश्वर, महात्मा बसवेश्वर, अहिल्यादेवी होळकर व अन्य कोणाचेही नाव देता सोलापूर हे मूळ नाव कायम ठेवण्याचा ठराव संमत करून शासनाकडे पाठविला होता.

मराठवाड्यातील वादाचा इतिहास
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरचा वाद चांगलाच गाजला होता. त्याची हिंसक प्रतिक्रिया उमटली होती. मराठवाडयत शिवसेनेचा जम बसण्यात विद्यापीठ नामांतराचा मुद्दा फायदेशीर ठरला होता. सवर्ण विरुद्ध दलित अशी दरी निर्माण झाली. विरोध डावलून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या नावात मराठवाडा हा शब्द कायम राहावा, असा तोडगा काढण्यात आला. त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आला. नामविस्ताराचा निर्णय घेऊन शरद पवार यांनी सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला, पण त्याची त्यांना राजकीय किंमत मोजावी लागली. 1994 मध्ये नामविस्तार करण्यात आला आणि 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. मराठवाडयत तेव्हा शिवसेना आणि भाजप युतीला जास्त जागा मिळाल्या होत्या. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरचा निर्णय पुरोगामी महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा होता, पण त्याची किंमत मोजावी लागल्याची भावना नंतर शरद पवार यांनीही बोलून दाखविली होती.

तीन नावांचा आग्रह
फक्त एका जिल्ह्यपुरत्या मर्यादित असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सोलापूमधील कार्यक्रमात धनगर समाजाच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे म्हणून पत्रके फेकण्यात आली. सोलापूर विद्यापीठाची उभारणी झाली त्या वेळी सुरुवातीलाच या विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यापैकी एकाचे नाव द्यावे, अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली होती. विद्यापीठाला सिद्धेश्वर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबरोबर माता जिजाऊ यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आल्याने सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे.