पिंपरी-चिंचवड : बरेच वर्षापासून महापालिकेची सत्ता भोगणार्या राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षाशी आमची लढत आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक शिवसेनेसोबत युती करून लढण्याची आमची ईच्छा आहे. तेदेखील जिंकण्यासाठी आमच्यासोबत येत असतील तर आम्हाला आनंदच आहे. नाही तर स्वबळावर 100 नगरसेवक निवडणूक आणून यंदा आम्ही महापालिकेची सत्ता ताब्यात घेणारच आहोत, असा दुर्दम्य आशावाद भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेले अनेक भ्रष्टाचार आम्ही पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणले आहेत. आणखी काही प्रकरणे योग्यवेळी चव्हाट्यावर आणू. शहरातील नागरिक त्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेले असून, मतदान यंत्रातूनच आता राष्ट्रवादीला ते उत्तर देतील. शंभर टक्के आमची सत्ता येणारच आहे, एकदा सत्ता आली की त्यांच्या भ्रष्टाचाराचा सगळा ‘हिशोब’ करू, असा खणखणीत इशाराही आ. जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. भाजपकडे उमेदवारीसाठी जवळपास 490 जण इच्छुक आहेत. आम्ही सर्व्हे करून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी देऊ, असेही आ. जगताप यांनी स्पष्ट केले. आ. जगताप यांनी शुक्रवारी दैनिक जनशक्ति कार्यालयास सदिच्छा भेट दिली, याप्रसंगी संपादकीय सहकार्यांशी दिलखुलास संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस व शहर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष नामदेव ढाके, ‘जनशक्ति‘चे समूह संपादक कुंदन ढाके, व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे, सरव्यवस्थापक हनुमंत बनकर, जाहिरात व्यवस्थापक अमित शिंदे, विशेष राजकीय प्रतिनिधी बापू जगदाळे, विशेष प्रतिनिधी गिरीश बक्षी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
(या मुलाखतीचा व्हिडीओ बातमीच्या शेवटी पाहू शकता.)
आ. जगताप म्हणाले, जर राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांनी महापालिकेत भ्रष्टाचार केला नसेल तर त्यांना भीती वाटायचे कारण नाही. आम्ही भ्रष्टाचार केला असेल किंवा आम्ही कोणत्या कामात दोषी असेल तर आमचीदेखील चौकशीची त्यांनी मागणी करावी. पण संपूर्ण शहराला माहीत आहे की, अनेक विकासकामांच्या निविदांमध्ये कशाप्रकारे वाढ करण्यात आली, सुरुवातीची मंजूर रक्कम व नंतरची रक्कम यात किती तफावत असते हे आम्ही वेळोवेळी दाखवून दिले आहे. अशा अनेक गैरकामांचे पुरावे आमच्याजवळ आहेत. पालिकेच्या ठेवी कुणी मोडल्या, पालिकेच्या जीवावर व्यवसाय कोण करतेयस असे अनेक गैरप्रकार हे राष्ट्रवादीच्या स्थानिक पुढार्यांकडून व त्यातही काही ठराविक लोकांकडून सातत्याने होत आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नाही. जनतेच्या पैशावर जर कुणी दरोडा टाकत असेल तर तो जनतेसमोर मांडायला नको का? यात लोकप्रतिनिधी म्हणून आमचे काय चुकले? असा सवालही आ. जगताप यांनी उपस्थित केला. त्यांचा काही भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे, आणखी काही पुरावे आहेत, तेही लवकर बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.
आरक्षणात माझीच सर्वाधिक जमीन गेली!
आज भारतीय जनता पक्षाची राज्यात व केंद्रात सत्ता आहे. या सत्तेचा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा फायदा जनतेला होत आहे. त्यामुळे नोटाबंदीसारख्या निर्णयाचे जनतेने स्वागतच केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत असून, भाजपचा हा झंझावात त्यांच्या पचनी पडत नसल्यामुळे विरोधाला विरोध म्हणून बिनबुडाचे आरोप त्यांच्याकडून माझ्यावरही होत आहेत. आज माझी वडिलोपार्जित जमीन आमच्याकडे असेल म्हणून मी टीडीआर किंग ठरतो का? उलट आमच्या कुटुंबाची 25 एकर जमीन आरक्षणामध्ये गेली आहे. मी जर लोकप्रतिनिधी आहे तर ती मी वाचवण्याचाच जास्त प्रयत्न केला असता, पण मी विकासाचे राजकारण करतो भ्रष्टाचाराचे नाही. म्हणूनच आज मी या क्षेत्रात जनतेच्या विश्वासावर व पाठिंब्यावर टिकून आहे, असेही आ. जगताप यांनी स्पष्ट केले. शहरात अनेक विकासकामे करायची आहेत. अनेक संस्था आणायच्या आहेत. जागेच्या आरक्षणाचा प्रश्न असून, प्राधिकरणाचा आराखडा दुरुस्त करणार आहोत. वैद्यकीय महाविद्यालय, चांगले महाविद्यालय आणि इतर संस्था आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच त्यात यश येईल, असेही आ. जगताप यांनी सांगितले.
काम करणार्यांनाच भाजपमध्ये संधी
राष्ट्रवादी व भाजपमध्ये काम करत असताना काय फरक जाणवतो या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजपमध्ये कार्यकर्त्याचे प्रामाणिक काम व ताकद पाहून न्याय दिला जातो. त्यामुळे त्याला पक्षात अनेक संधी मिळू शकतात. पण राष्ट्रवादी पक्षात कामाला व प्रामाणिकपणाला महत्त्व नाही. त्यामुळे अनेक नेत्यांची कुवत नसतानादेखील पदे दिली जातात व कुवत असूनदेखील संधी दिली जात नाही. म्हणूनच विधानपरिषदेला पुण्याचा उमेदवार दिला गेला. त्यामुळे आताही राष्ट्रवादी पक्षात असलेल्या काही नेत्यांची मोठ्या प्रमाणात घुसमट होत आहे. हे शहरालाही दिसतेच आहे. मला मंत्रिपदात स्वारस्य नाही. शहराच्या विकासावर मी लक्ष केंद्रित केले आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. शहरात राष्ट्रवादीविरोधी जोरदार लाट असून, ही लाट आता मतदान यंत्रातूनच प्रगटेल. त्यामुळे अजित पवारांनी शहरात कितीही मुक्काम ठोकला, उद्घाटने केली अन् आश्वासने दिली तरी शहरवासी त्यांना भुलणार नाही, असेही आ. जगताप यांनी स्पष्ट केले.
निवडणूक जिंकण्यासाठी युती करू!
युतीसाठी शिवसेनेपुढे प्रथम प्रस्ताव ठेवणार्या शहर भाजपने व खुद्द आमदार जगताप यांनी युतीसाठी अद्यापही सकारात्मक असल्याचे सांगितले असले तरी स्वबळाची भूमिकाही स्पष्ट केली. युती करावयाची असल्यास भाजप, शिवसेना अन् मित्रपक्ष यांचा विचार करून योग्य फॉम्युला होत असल्यास आम्हीदेखील विचार करू असेही ते म्हणाले. मात्र युती झाल्यास भाजपचे थोडेफार नुकसान होत असले तरी दोघांनाही बराच फायदा आहे. सत्ता मिळविण्यासाठी दोघांनी एकत्र यावे, केवळ जागावाटपाच्या भूमिकेवर अडून बसून चालणार नाही. गरज पडली तर दोन पाऊले आम्ही मागे येण्यास तयार आहोत. शेवटी इतके वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला बाजूला सारण्यासाठी शिवसेना-भाजपची युती व्हायला हवी, असेही आ. जगताप यांनी स्पष्ट केले.
जगताप, लांडगे अशी कोणतीही स्पर्धा नाही
भोसरीचे आमदार महेश लांडगे व माझ्यात कोणतीही स्पर्धा नाही. लांडगे यांना मीच पक्षात घेण्याबाबत वारंवार पुढाकर घेतला होता. भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती माझ्यापेक्षा काहीपटीने त्यांना चांगली माहित आहे. त्यामुळे काही बाबतीत त्यांना शहर पातळीवरुन सूट देण्यात आली असल्याचे सांगून आम्ही चांगले मित्रच असल्याचे सांगितले. तसेच, भोसरीत जुना-नवा असा वाद दिसत असला तरी तो मिटेल. जुन्या कार्यकर्त्यांना सत्ता आली तर निश्चितपणे योग्य ठिकाणी सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी स्प÷ष्ट केले.
भाजपमध्ये उमेदवारीसाठी पक्ष सर्व्हे महत्त्वाचा..
गेल्या काही दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. आजपर्यंत 490 जणांनी या मुलाखती दिल्या आहेत. काही जुने कार्यकर्ते, इतर पक्षातून आलेले नेते व कार्यकर्ते हेदेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहे. काहीजण आमच्यावर विश्वास ठेवून पक्षात आले आहेत. तर काही अद्याप वेटिंगवर आहेत. या सर्वांना उमेदवारी देण्याची मोठी कसरत आहे. तरीही शहर भाजपच्यावतीने शहरात सर्व्हे करण्यात येणार असून, हा सर्व्हे ज्या उमेदवाराला अनुकूल येईल, त्यांना उमेदवारी दिली जाईल. निवडून येण्याची क्षमता हाच निकष आहे. शेवटी सत्ता मिळविणे हेच पक्षाचे ध्येय आहे, असेही आ. जगताप यांनी स्पष्ट केले. या उपरही कोणत्याही नेत्यावर अथवा कार्यकर्त्यावर अन्याय न करण्याची आमची भूमिका आहे. ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांना इतर ठिकाणी संधी दिली जाईल, असेही आ. जगताप यांनी स्पष्ट केले.