2014 साली भाजपला केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता मिळाली. त्यानंतर तीन वर्षांनी पुणे महापालिकेची निवडणूक झाली आणि त्यात भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले. सर्व सत्तास्थाने जिंकून एक वर्तुळ पूर्ण झाले. पण संघटनेला महत्त्व देणारा भाजप हा पक्ष राहिला का? किंवा 2014 सालचा भाजप आज राहिला का? असा प्रश्न निर्माण झाला. याचे कारण सत्तेसाठी भाजपने दारे खुली केली आणि त्या उघडलेल्या दारातून काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रवेश केला. ही इन्कमिंगची लाट एवढी होती की काँग्रेसमुक्त भारतऐवजी काँग्रेसयुक्त भाजप असे स्वरुप आले. संघाने घालून दिलेली पक्षातील चौकट मोडली, बेशिस्त वाढली आणि निष्ठावंत फेकले गेले. मोतीबागेची सहल करूनही फरक काही पडला नाही. उलट, पक्षात जुने आहेत म्हणून किती कुरवाळायचे असे प्रश्न निनावी पत्रातून विचारले जाऊ लागले. हा सवाल भाजपसाठी अनेक अर्थाने कळीचा ठरला आहे. महापालिकेतील तोडफोडीने भाजपतील दोष दाखविण्यासाठी कारभाराची सुरुवात झाली आणि वर्ष सरत असताना निनावी पत्राने खळबळ उडविली.
दरम्यान गुजरात निवडणुकीने भाजप नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले आणि काँग्रेसला बळ दिले. पुण्यात विशेषतः जुन्या भागात काँग्रेसची पाळेमुळे खोलवर आहेत. जरासे अनुकूल वातावरण झाले तर काँग्रेसचे मतदार एकत्र येतात असा अनुभव आहे. पुण्यातील पुरोगामी विचाराचे मतदारही काँग्रेसकडे झुकतात असेही दिसून आले आहे. गुजरात निकालानंतर बदललेल्या राजकीय स्थितीचा विचार भाजप नेत्यांना आगामी वर्षात तरी करावा लागेल. नोटाबंदीच्या आधीचे वातावरण आणि नंतरचे वातावरण अशा दोन टप्प्यांत पाहिले तर नोटाबंदीनंतर राज्यकर्त्याविषयी असंतोष वाढलेला दिसून येईल. अनेक व्यावसायिक गटात जी कोंडी झाली त्यातून सुटका अजून झालेली नाही. व्यापारी वर्गाला चुचकारण्यासाठी मोदी सरकारला जीएसटीत बदल करून वाकावे लागले. 2014 मध्ये पुण्यातील व्यापारी वर्ग भाजपच्या पाठिशी 100 टक्के होता तसा 2017 मध्ये तरी नव्हता. जन धन योजना जाहीर केल्यावर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण होते ते कार्यकर्त्यांनी आठवून पहावे. ते वातावरण आता उरलेले आहे का? दरम्यान मोदी सरकारचे आर्थिक निर्णय व त्याचे परिणाम हे मुद्दे काँग्रेसने हाती घेतले आहेत.
मुठा नदी सुधार योजनेसाठी सल्लागार नेमून भाजपने एक पाऊल पुढे टाकले. मेट्रोची कामे प्रत्यक्षात रस्त्यावर सुरू केली आहेत. एसआरए योजना पुढे जाण्याच्यादृष्टीने निर्णय होऊ लागले आहेत. चांदणी चौक उड्डाण पूल आणि अन्य उड्डाण पुलासाठी चिकाटीने पाठपुरावा चालू आहे. सरत्या वर्षातील या गोष्टी भाजपसाठी जमेच्या आहेत. लोकांच्या अपेक्षा मोदी आणि त्यांच्या पक्षाकडून आहेत. आर्थिक मंदी दूर व्हावी, महागाई कमी व्हावी, सामान्य माणसाला स्वत:चे घर मिळावे, आणि शहर सुंदर व्हावे, मुख्यत्वे कायदा सुव्यवस्था रहावी अशा अपेक्षा आहेत. 2017 सालातील यापैकी किती पूर्ण झाल्या याचा आढावा घेऊन 2018 त पक्षाने वाटचाल करावी. पक्षातील सगळ्यांना कोणीतरी एकत्र आणेल अशी अपेक्षा ठेवून नवीन वर्षाकरिता शुभेच्छा द्याव्यात.
– राजेंद्र पंढरपुरे
9623442517