इंदापूर: शासकीय नोकर भरतीसाठी सरकारने महापोर्टल सुरु केले आहे. याद्वारे परीक्षा घेतली जाते आहे, मात्र यात पारदर्शकता नसल्याची ओरड परीक्षार्थी करत असतात. ही पद्धत बंद करण्यात येऊन पूर्वी प्रमाणेच नोकर भरतीसाठी परीक्षा घेतली जावी अशी मागणी तरुण करत आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुर्पिया सुळे यांनी महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आल्यास पहिल्यांदा महापोर्टल बंद करण्याचा निर्णय घेऊन तरुणांना नोकरी देण्याचे काम करण्यात येईल असे आश्वासन दिले. इंदापूर येथे आघाडीचे उमेदवार दत्ता भरणे यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
आघाडीची सरकार असताना पोलीस भरतीसह शासकीय विभागात मोठ्या प्रमाणात नोकर भरती व्हायची मात्र, गेल्या पाच वर्षात शासकीय विभागातील नोकर भरती करण्यात आलेली नाही. ज्या ठिकाणी नोकर भरती झाली त्यात महापोर्टलच्या माध्यमांतून गैरप्रकार झाल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे महापोर्टल बंद करण्याची मागणी होत आहे. यासाठी अनेक ठिकाणी परीक्षार्थीनी मोर्चे काढले.