सत्तेच्या घटस्थापनेसाठी डाव!

0

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या म्हणजेच गुरूवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपापल्या नव्या डावाची सुरूवात करणार आहेत.

नारायण राणे गुरूवारी आपली नवी राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. सध्या सिंधुदूर्गमध्ये तळ ठोकून बसलेले राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच कुडाळमध्ये शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसचे प्रदोशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांनी २१ सप्टेंबरला पुढची दिशा स्पष्ट करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे गुरूवारी राणे नेमके काय जाहीर करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात दरी निर्माण झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी नवी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या संघटनेचे नाव काय ठेवावे, तिचा ध्वज कसा असेल, संघटनेची घटना काय असेल, शेतकऱ्यांसाठी नेमकी कोणती भूमिका घ्यायची, हे ते गुरूवारी कोल्हापूरमध्ये जाहीर करणार आहेत.

एकेकाळी तरूणांचे आकर्षण असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता तरूणांबरोबर राहण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच घटस्थापनेच्या मुहूर्तावर त्यांनी फेसबूकवर (facebook) उपलब्ध राहण्याचे ठरविले आहे. गुरूवारी, २१ सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता, प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे याचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पक्षाचे कार्यकर्ते, नेते, सरचिटणीस, प्रमुख संघटक आदी उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यावेळी त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.