सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जाणार्या यवतमाळ जिल्ह्यात परवा एका शेतकर्याने झाडाच्या पानावर ’मोदी सरकार, शेतकरी आत्महत्या’ असे लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या ही तर फॅशन आहे असं म्हणणार्या लोकांचे सरकार असलेल्या राष्ट्रात खरतर ही आश्चर्याची गोष्ट नसावी. शेतकरी या नावाभोवती चिपकून राहून केवळ आपल्या भाकर्या भाजून घेणार्या कुठल्याही सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्टय. गेल्या सरकारात राहुल गांधींनी भेट दिलेल्या कलावतीचे आणि तिच्या परिवाराचे काय झाले? किंवा अशाच प्रकारची बोगस सहानुभूती दाखविल्या गेलेल्या अनेक शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराचे पुढे काय झाले? हे कुठलेही सरकार पाहत नाही. आत्महत्या या शब्दाला ग्रस्त सारखा रोग लावून शेतकरी नावाच लॉलीपॉप फाईलीच्या रूपाने चघळत राहणारी ही व्यवस्था आहे.
आज शेतकर्यांच्या समस्या आणि शेतकरी म्हटले की अनेक राजकीय पुढारी आणि पक्ष आधुनिक शेतीच्या गप्पा करतात. अर्थात आधुनिक आणि कमी खर्चात शेती होणे ही काळाची गरजच आहे. मात्र महाराष्ट्रातील अनेक टक्के शेतकर्यांची स्थिती ही आधुनिक शेती करण्याच्या लायक आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. बेसिक गोष्टी न मिळणार्या शेतकर्यांच्या माथी वेगवेगळ्या योजना ह्या केवळ कागदावर उतरवणे सोप्पे आहे मात्र अमलात आणणे कठीण. शेतकरी आत्महत्या, नैसर्गिक विपत्ती, शेतीमालाला भाव या सगळ्या गोष्टी राजकीय लोकांना त्यांच्यासाठी केवळ एक मुद्दा बनवून पोळी भाजण्याच्या झाल्या आहेत. आपल्या सोयीप्रमाणे सत्ताधारी असो वा विरोधक हे पोळी भाजण्याचे काम निरंतर करत आलेले आहेत आणि सध्याही सुरु आहे. बिकट परिस्थितीत शेतकर्यांच्या प्रश्नाकडे समंजसपणे व सहानुभूतीने पाहणे हे इतरांचे सामाजिक कर्तव्य ठरते. पण नेमका त्याचाच अभाव सगळीकडे दिसून येतोय. चंद्रकांत वानखेडे म्हणतात, चिंतनशील वृत्तीने शेतकर्यांच्या समस्येकडे पाहण्याऐवजी त्यांचे शोषण करून करून आपले उखळ पांढरे कसे करून घेता येईल असाच प्रयत्न व्यापारी, दलाल, राजकारणी, कर्मचारी करीत असतात. त्यामुळे शेतकर्यांचे जीवन पराकोटीचे हतलब झालेले दिसून येतेय. अशा व्यवस्थेत जो शेतीवर राबला आहे, ज्याला शेतीच्या व्यवसायाचा अनुभव आहे, तेथील परवड ज्याला माहित आहे असाच साहित्यिक, पत्रकार या वेदनेला शब्दस्वर देऊ शकतो. त्यांचे हे वाक्य कालही त्रिकालबाधित सत्य होते, आजही आहे आणि उद्याही राहील यात तिळमात्रही शंका नाही.ऐतिहासिक कर्जमाफीच्या नावावर प्रचंड जाहिरातबाजी करून राज्यात जाहीर केलेली कर्जमाफी जाहीर केल्यापासून वादाच्या भोवर्यात आहे. सध्या या कर्जमाफीचे वेगवेगळे गोंधळ समोर येत आहेत.
अशा वेळी अशा वेळी विरोधकांचे काम विरोधक करताहेत, मार शेतकर्यांना विश्वासू वाटणारी माणस कुठ आहेत? शेतकर्यांसाठी आंदोलन करणारे काही सामाजिक कार्यकर्ते आणि नेते आपल्या सत्तेतील स्थानाला घट्ट पकडून आहेत. यातल पाहिलं नाव म्हणजे यवतमाळमधले किशोर तिवारी. विदर्भातील शेतकरी नेते म्हणून प्रसिद्ध असलेले तिवारी साहेबांनी काँग्रेस सरकारच्या नाकात दम आणून ठेवला होता. मात्र अलीकडे भाजप सरकारने त्यांची ‘वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन’च्या अध्यक्षपदी निवड केल्यापासून ते गायब झालेत. मध्यंतरी शेतकरी आंदोलनाच्या वेळी सरकारच्या बाजूने बोलायला काही काळाकरिता उगवले आणि नंतर पुन्हा गायब झालेत. तसेच एक नाव म्हणजे सध्याचे मंत्री असलेले आणि कधीकाळी शेतकर्यासाठी जीवाचे रान करून आणि सरकारच्या विरोधात जीव तुटेस्तोवर ओरडणारे सदाभाऊ खोत. प्रत्येक गोष्टीत सरकारला अंगावर घेणारे सदाभाऊ आज सरकारशी चर्चा करूनही प्रश्न सुटू शकतात अशी भूमिका बदलवून घेताहेत हे आश्चर्यजनकच आहे. असो, अशी अनेक नावे असू शकतात. मात्र याचवेळी सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधात दंड थोपटणारे खा. नाना पटोले यावेळी आशेचा किरण वाटतात. यवतमाळला जाऊन त्या शेतकर्याच्या परिवाराची भेट घेऊन आपल्याच सरकारची लक्तरे हा लोकप्रतिनिधी काढतो.
असो, सत्ता ही माणसातल्या माणसाला बटिक बनवते. म्हणूनच ’शेतकरी आत्महत्या फॅशन आहे’, ’शेतकरी रिचार्ज करतो, मग बिल भरू शकत नाही काय?’ अशी विधाने तथाकथित शेतकर्यांचे कैवारी असणार्या या लोकांच्या तोंडून निघतात. अधिकारी लाखोंची लाच घेताना सापडतात, शहरातल्या गृहनिर्माण प्रकल्पात कोट्यावधीचा घोटाळा होतो, शेतकर्यांच्या नावावर उभारलेल्या सिंचन प्रकल्पात करोडो रुपये खाल्ले जातात, शेतकर्यांच्या जमिनी लुबाडून अब्जावधीचे प्रकल्प उभारले जातात, शेतकर्यांवर अन्याय करून समृद्धीचे गाणे गायले जाते, बुलेट ट्रेन सुसाट धावते आणि इकडे शेतकरी मात्र काही हजार, लाख रुपयांच्या कर्जापायी मरणाला जवळ करतो. त्यांनतरही त्याची फरफट थांबत नाही. पात्र-अपात्रतेच्या घोळात तो पुन्हा घोळला जातो. मयतावरच्या टाळूवरचे लोणी खाणारी जमात तिथेही त्यांना सोडत नाही.
-निलेश झालटे
9822721292