सत्तेतून बाहेर पडून भाजपच्या लोकांवर टीका करा

0

एकनाथराव खडसे यांचा शिवसेनेवर पलटवार; सामनामध्ये केली होती खडसेंवर टीका

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना काँग्रेस- राष्ट्रवादीकडून खुली ऑफर आहे. मात्र पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच. या जन्मातले कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते, अशी टीका शिवसेनेने सामनामधून केल्यानंतर खडसे यांनीही शिवसेनेवर पलटवार केला आहे. शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही. त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावे आणि मग भाजपच्या लोकांवर टीका करावी.’ अशा शब्दात भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी शिवसेनेने ‘सामना’तून केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.

शिवसेनेची सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते सत्तेत राहूनच भाजपवर टीका करत राहतील, असेही यावेळी खडसे म्हणाले. खडसेंनी सत्तेचा वापर करुन मुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख आणि इतरांना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीच सत्ता आज खडसेंवर उलटली आहे, असे सामनामध्ये म्हटले आहे. खडसे हिरो बनायला निघाले होते, पण राजकीय मंचावर त्यांना साईड रोल मिळाला. मात्र मुख्यमंत्र्यांनी तोही काढून घेतला. त्यामुळे खडसे आज भाजपच्या राजकारणातून बाद झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांना ते पूर्वीचे स्थान उरलेले नाही. जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ नाथाभाऊ खडसेंवर का यावी, हा राजकीय अभ्यासाचा विषय आहे असे टीकास्त्र ‘सामना’तून सोडले आहे.