नवी दिल्ली : देशाची सत्ता हातात येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केला. ते गुरूवारी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. राहुल यांनी संघासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. या वेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, खासदार अहमद पटेल, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला, जेडीयू नेते शरद यादव आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
सत्ता असेपर्यंतच देशाशी बांधिलकी
राहुल गांधी म्हणाले, सत्ता असेपर्यंतच संघातील लोकांची देशाशी बांधिलकी असेल. हा देश आमचा आहे, तुम्ही या देशाचे नाहीत, ही संघाची विचारसरणी आहे. गुजरातमध्ये दलितांना मारहाण करून संघाने ते दाखवून दिले आहे. आपल्या विचारसरणीने देशातील निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे संघाला ठाऊक असल्याने ते देशातील महत्त्वपूर्ण संस्थेत त्यांच्या माणसांची वर्णी लावत आहेत. तसेच संघाला देशाची घटना बदलून टाकायची आहे, असा गंभीर आरोपही राहुल यांनी केला.
जिथे जातात तिथे खोटे बोलतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल म्हणाले, देशातील शेतकरी आक्रोश करतोय; हा देश शेतकर्यांचा राहिला नाही, हा देश फक्त 15-20 उद्योगपतींचा झाला आहे. कर्जमाफी आमच्या धोरणात बसत नसल्याचे अरूण जेटली लोकसभेत सांगतात. त्यामुळे शेतकरी मेले तरी यांना फरक पडणार नाही. मोदी सतत मेक इन इंडियाचा नारा देत असतात. बाजारपेठेत मात्र चिनी बनावटीच्या वस्तूच पाहायला मिळतात. यावरून एकच सिद्ध होते की, मोदींचे मेक इन इंडिया धोरण फसले आहे. जिथे जातात तिथे खोटे बोलतात, हेच मोदींचे धोरण आहे, अशी टीका राहुल यांनी केली.
फक्त दोनच व्यक्ती देश चालवतात
या कार्यक्रमात काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहांवर टीका केली. पटेल म्हणाले, देश फक्त दोनच व्यक्ती चालवत आहेत. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे अमित शहा. देशातील अशी एकही संस्था राहिलेली नाही. ज्याचा गैरवापर या केंद्र सरकारने केलेला नाही. प्रत्येक संस्थेचा वापर ते आपल्या स्वार्थासाठी करत आहेत. तर फारूख अब्दुल्ला म्हणाले, चीन किंवा पाकिस्तानपेक्षा भारतातच बसलेल्या लोकांकडून देशाला धोका आहे. हे दोन्ही देश भारताचे काहीच बिघडवू शकत नाहीत. खरा चोर तर आपल्या देशातच बसला आहे.