सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार; कॉंग्रेसची घोषणा

0

नवी दिल्ली: सत्तेत आल्यावर तिहेरी तलाक कायदा रद्द करू अशी घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दिल्लीत आयोजित अल्पसंख्यांक अधिवेशनात महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव यांनी ही घोषणा केली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून करण्यात आलेली ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पंतप्रधान आज काल अतिशय घाबरलेले दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीती अगदी स्पष्टपणे दिसून येते, अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ‘अच्छे दिन आयेंगे’ अशी घोषणा आधी भाजपाची मंडळी द्यायची. मात्र आता देशातील जनता ‘चौकीदार ही चोर है’ म्हणते आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

देशाला धर्म-जातीच्या आधारे तोडून पंतप्रधान होता येत नाही. जाती-धर्मांमध्ये देशाचे तुकडे केल्यानं, द्वेष पसरवल्यानं भारतावर राज्य करता येत नाही, हे आता मोदींच्या लक्षात आलं आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जोडण्याची भाषा करायला हवी. जो देशाला तोडण्याची भाषा करेल, त्याला पंतप्रधान पदावरुन हटवण्यात येईल, अशी टीका राहुल यांनी केली.