सत्ता, सत्ता पाहिजे! मग ती गावच्या पाटीलकीची असो, की, सरपंचांची! पुढे स्थानिक स्वराज संस्थांची, राज्याची, देशाची सत्ता, सत्ता पाहिजे. त्यासाठी जीवाची बाजी लावून, पैसा-अडका खर्च करून निवडून यायचे आणि सत्ता नसायची. यामुळे कासावीस होणे यात काही गैर नाही. सत्तेपुढे कितीही शहाणा, हुशार माणूस असला तरी त्याचे काही चालत नाही. सत्तेपुढे सर्व खुजे आहे. त्याचे प्रत्यंतर महाराष्ट्राच्या सत्त्व स्पर्धेत येत आहे. भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष झाल्याने साहजिकच सत्तेत हवे ते परिवर्तन करण्याचा अधिकार घटनेने त्यांना मिळाला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार कामाला लागण्यापूर्वीच शरद पवारांनी सत्ता संपादनासाठी किंवा चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली, त्यावेळी राष्ट्रवादीकडे भाजपने पाठिंबा मागितला नव्हता. त्यामुळे सर्वात मोठी पंचाईत शिवसेनेची झाली होती. आत्ताही तीच स्थिती आहे.
आत्ताही भाजप राष्ट्रवादीच्या आमदारांच्या संपर्कात असल्याच्या वार्ता करून मध्यावधीच्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत आहे. एकूण सर्व घटनाक्रम पाहता यामुळे एकीकडे पक्ष फुटू नये म्हणून विरोधी पक्षाचा आव आणून संघर्ष करण्याचे उसने अवसान आणले आहे, तर दुसरीकडे वचननाम्यातील वाचन पूर्ण न करू शकल्याने शिवसेनेची अस्वस्थता बाहेर पडत आहे. मात्र, त्यामुळे भाजपने त्यांना पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू केल्यावर अखेर हे अवसान गळून पडले आहे, हे एवढे निश्चित!
देशभरात नरेंद्र मोदींची जादू सुरू आहे. एकापाठोपाठ एक-एक राज्य काँग्रेसकडून जात आहे. सत्ता नसली की, अनेक नेते गुदमरून जातात. त्यामुळे मग सत्ता तिथे आम्ही हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून पक्षांतरे केली जातात, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता येणार नाही, असे दिसताच अनेक दिग्गजांनी उड्या मारल्या. त्या सध्याही सुरू आहेत. सत्तेशिवाय किमान काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते जगू शकत नाहीत. तीच स्थिती गेली काही महिने शिवसेनेची झाली आहे. याच परिस्थितीचा फायदा सत्ताधारी पक्ष भाजप घेत आहे. एकदा सत्तेची धुंदी चढली, की विचारशक्ती खुंटते. तसाच प्रकार सुरू आहे. आपले स्थान कसे आणि किती बळकट आहे हे दाखवून देत आहे.सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आमदार निलंबन असो किंवा विधेयके चर्चेविना पास करून घेण्याची प्रक्रिया असो, भाजप गोंधळातही सारे आपल्याच नेटाने रेटण्याचा पुरेपूर आणि यशस्वी प्रयत्न करत आहे. सेनेने सत्तेसाठी भाजपला अर्थसंकल्प मांडू दिला.
शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याचे शुक्रवारी दिसून आले. मात्र, सेनेवर होत असलेल्या बेछूट आरोपांमुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. पुन्हा एकदा मांडीला मांडी लावून आमचे अमर प्रेम आहे असा दावा करणारे सेना-भाजप आज एकमेकांविरोधात आतल्या आत धुसफूसत आहेत.अधिवेशन चालू आहे, आपल्या शेजारी बसणारे आज सत्तेच्या खुर्च्या उबवतात आणि सेनावाले फक्त बाजूला बसून तमाशा पाहतात. एकूणच यामुळे सेना सत्तेपासून दूर चालली असल्याचे चित्र स्पष्ट होते. शिवसेना नेत्यांना सत्ता हवी आहे आणि म्हणूनच ते सत्तेत सहभागी असूनही विरोधाची भूमिका मांडत आहेत. सत्ता नाही तर सर्व रखरखाटच! याची झळ मातोश्रीला लागत आहे यात वाद नाही. आज सेना सत्तेत सहभागी असूनही विरोधात आहे. खरे तर आपण प्रादेशिक पक्ष म्हणून राज्यासाठी किती काय करतोय हे दाखवण्याची सेनेला संधी आहे. त्यासाठी जनहिताचे मुद्दे त्यांना हाती घ्यावे लागतील. शेतकरी नैसर्गिक संकटांनी वेढलेला आहे. त्यामुळे आणखी दोन, चार महिन्यांत तेथे काय होणार, याची कल्पनाच केलेली बरी. राज्यातील शेतकर्यांची अवस्था म्हणजे तो व्हेंटिलेटरवर आहे अशी आहे. त्यासाठी भविष्यातील तरतुदीसाठी सत्तेतून सरकारला भाग पाडू शकते. मात्र, सत्तेचा विचार करून सावध भूमिका सेनाही घेत आहे. दरम्यान, राज्यात सरकार चालवायचे असेल, तर निर्विवाद बहुमत पाहिजे हे भाजपने ओळखले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला जवळ घेणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासारखे आहे आणि म्हणूनच भाजपने सेनेला जवळ घेण्याचे धोरण आजही कायम ठेवले. भाजपचे वरिष्ठ मातोश्रीवर जाऊन चर्चेची गुढी उभारायचा प्रयत्न करणार असल्याच्या चर्चांना धुळवडीनंतर चांगलाच रंग येणार हे नक्की.
शेतकरी कर्जमाफीसारख्या संवेदनशील विषयावर आरपीआय, शिवसंग्राम, रासप, स्वाभिमानी या पक्षांची नैतिकताही आता चांगलीच खालावल्याचे दिसत आहे. शेतकर्यांमुळे खासदार झालेल्या राजू शेट्टी यांना आता बळीराजाचे अश्रू दिसेनासे झाले आहेत. ते फक्त अधिवेशनाच्या बाहेर मतदारसंघात त्यांची बाजू मांडताना दिसून येतात. काँग्रेसच्या राजवटीत रान उठवणारा हा नेता आता सत्तेच्या लालसेपायी मूग गिळून गप्प आहे, असे चित्र आहे. महादेव जानकर जाण नसल्यासारखे वावरत आहेत. यावरूनच राजकारणाची पातळी किती घसरू शकते, हे दिसते. रामदास आठवलेंबद्दल वेगळे काही बोलायची गरज नाही. सत्तेपुढे शहाणपण नाही, असे म्हणतात. महाराष्ट्राच्या सध्याच्या स्थितीला हे वाक्य तंतोतंत लागू पडते. सेनेच्या विरोधापायी भाजपची घुसमट होतेय. सत्ता ही भल्याभल्यांना बिघडवते. त्यामुळे उद्या कुठलेही समीकरण निर्माण झाले, तरी नवल वाटून घेण्याची कारण नाही. राजकारणात सगळे क्षम्य असते आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नसते हेच खरे!
– सीमा महांगडे
9920307309