सध्या भारतात भाजपची लाट आहे असे म्हटले तर भाजपविरोधकांना मान्य होणार नाही. आपल्याकडे विरोधक म्हणजे विरोध केलाच पाहिजे. मग अगदी वास्तव नाकारून अवास्तव दावे केले गेले तरी त्यात वावगे मानले जात नाही तसेच भाजपसाठीच्या सकारात्मक वातावरणाबद्दल आहे. चंदिगड मनपाची निवडणूक असो, ओरिसातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो वा आपल्या महाराष्ट्रातील नपा, मनपा, जि.प. निवडणुका असो भाजप जोरदार आगेकूच करताना दिसत आहे.
विरोधकांचे म्हणणे असे की भाजपची लाट वगैरे नाहीच. पण त्यांचे यशही निर्भेळ नाही. ते सत्ता आणि मालमत्तेचा गैरवापर करूनच मिळवलेले आहे. मुळात यश हे यश असते. ते कसे मिळवले तो नंतरचा चर्चेचा मुद्दा असू शकतो. मात्र, तरीही त्याने यशाचे महत्त्व कमी होत नसते. मुळात भाजपने जे मार्ग निवडणुकीत अवलंबले ते याआधी कोणत्याही पक्षाने अवलंबलेच नव्हते, हे किमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तरी बोलूच शकणार नाही. फरक एवढाच की भाजपने आजवर कोणीच वापरले नव्हते तेवढ्या प्रभावीरीत्या नियोजन करून त्या मार्गांचा, वादासाठी गैरमार्गांचा वापर केला आणि यश मिळवले.
मात्र, यश मिळाल्याबद्दल भाजपचे कौतुक करत असतानाच या पक्षाने यशाने मिळालेल्या सत्तेबरोबरच काही जबाबदार्याही येत असतात, हे विसरू नये. नेमके याच जबाबदारपणाचा विसर भाजपच्या नेत्या-कार्यकर्त्यांना पडलेला दिसत आहे. त्यामुळे एक वेगळा उन्माद त्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसत आहे. नव्हे तो खुपत आहे. ते मात्र, कदापि योग्य म्हणता येणार नाही.
उन्मादी वागण्याचे पहिले बीभत्स दर्शन घडले ते महाराष्ट्राच्या सोलापुरात. तेथे भाजप समर्थक आमदार परिचारक यांनी थेट सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवण्याचा कमालीचा मूर्खपणा केला. त्यातून विनोद निर्माण करण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. त्यातून मने दुखावली गेलीत ती कायमचीच.
अर्थात चुकणार्याने चूक मान्य केल्याने प्रकरण संपतेच असे नाही. त्यामुळे त्याच्या प्रतिक्रिया उमटतच राहिल्या. त्यातूनच मग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील घटना घडली. त्याआधी दिल्ली विद्यापीठाची घटना घडून गेली होती. परिचारक यांच्या निषेधासाठी स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाने निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. त्यासाठी एसएफआयचे कार्यकर्ते विद्यापीठ आवारात पोस्टर लावत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्या पोस्टरवर भाजपच्या नावाला त्यांचा आक्षेप होता. तसे करताना दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली जी नंतर फ्रीस्टाइल हाणामारीत बदलली.
विद्यार्थी संघटनांमधील हाणामारीच्या ज्या दोन क्लिप व्हायरल झाल्या त्यावरून स्पष्ट दिसत आहे की कोणालाही कसलीही पर्वा नव्हती. एकमेकांवर हल्ले, अर्वाच्च शिव्यांचा मुबलक वापर. सारे काही मोकळेपणाने सुरू आहे. ते होऊ नये अशी ज्यांची जबाबदारी ते विद्यापीठाचे सुरक्षारक्षक मात्र निवांत दिसत आहेत.
अर्थात आता आपण विद्यापीठ प्रशासनावर नाही तर सत्ता आणि जबाबदारीवर चर्चा करत असल्याने पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो. सत्ता मिळाल्यानंतर व्यक्ती असो की संघटना यांची स्थिती फळाने लगडलेले झाड भाराने आपोआप झुकते तशी झाली पाहिजे. तशी न होता ते ताठच राहिले तर दगडांचा अधिक मारा ठरलेला. नम्रतेबरोबरच जबाबदारीची जाणीवही वाढली पाहिजे. मात्र, तसे होणे दूरच घडताना उलटच दिसत आहे. भाजप सत्तेवर आल्यापासून भाजप, भाजप समर्थक आणि सोबतच्या संघटनांमधील काहींचे रथ हे दहा बोटे वरच धावू लागले आहेत. त्यातूनच मग विरोधी पक्ष वावगे वागत असेल तर आपण आणखीच वावगे वागायचे. पुणे विद्यापीठाचेतेच घडले. व्हिडिओ पाहताना स्पष्ट कळते. कोणीच कोणाला जुमानत नव्हते. अगदी फ्रीस्टाइल अशी मारामारी चालली आहे. पुन्हा दोन्ही संघटना वैचारिक वारसा सांगणार्या. डावे असो वा उडवे. मात्र, वर्तन एकसारखेच. पण तरीही अभाविप सत्ताधार्यांशी संबंधित असल्याने कायदा मोडताना त्यांनी थोडेतरी जबाबदारीचे भान ठेवलेच पाहिजे होते, असे सांगणे गैर नाही.
त्यात आता नवा पराक्रम भाजपचे म्हैसूर येथील खासदार प्रताप सिम्हा यांचा. दिल्ली विद्यापीठाच्या रामजस महाविद्यालयातील हिंसेबद्दल समाजमाध्यमांद्वारे उमटत असलेल्या प्रतिक्रियांमध्ये त्यांनीही उडी घेतली. असा समाजमाध्यमांवरील प्रचार करणार्या गुरमेहर कौर या विद्यार्थिनीची तुलना त्यांनी कुख्यात माफिया डॉन दहशतवादी दाऊद इब्राहिमशी केली आहे. गुरमेहरचे वडील कारगील युद्धातील हुतात्मा. तिने ऑनलाइन कॅम्पेनमध्ये माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारले असे लिहिलेला फलक हाती घेऊन तिने फोटो व्हायरल केला. खासदार सिम्हा यांना तिचा तो फोटो वापरत ट्विट केले. त्यात त्यांनी गुरमेहरच्या फोटो शेजारी दाऊद इब्राहिमचा फोटो ट्विट केला. देशद्रोही भूमिका मांडायला दाऊदने किमान वडिलांच्या नावाचा तरी वापर नाही केला असे त्यांनी म्हटले आहे. दाऊदच्या हातात असलेल्या पोस्टरवर 1993च्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना मी नाही मारलं तर बॉम्बमुळे ते मेले असं लिहिलं आहे.
विचार पटणार नाहीत. विरोध रुचणार नाही. पण खपवून घ्यावाच लागेल. लोकशाहीत विचारस्वातंत्र्य आहे हे किमान सत्ताधार्यांनी विसरायचे नसते आणि शब्द वापरताना त्यांनी कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजीही. परिचारक आणि सिम्हा यांच्या जोडीने सर्वच विद्यार्थ्यांनी जबाबदारीची जाणीव विसरू नये, हीच अपेक्षा.