मुंबई । गिरीराज सावंत – मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा आणि कुरघोडीचे राजकारण सुरू एकाबाजूला सुरू आहे. मात्र दुसर्याबाजूला सत्तेत राहण्यावरून शिवसेनेच्याच मंत्र्यांमध्ये संदोपसुंदी सुरू झाल्याची माहिती उघडकीस आली. शिवसेनेचा स्वाभिमानी मराठी बाणा दाखवून देण्यासाठी मिनी विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान जाहीर केलेल्या भूमिकेनुसार राज्यातील सत्तेतून बाहेर पडावे असा अट्टाहास शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी धरण्यास सुरुवात केली आहे. तर दुसर्या बाजूला शिवसेनेच्या वरिष्ठ मंत्र्यांनी अर्थात कॅबिनेट मंत्र्यांनी सत्तेत राहण्याचे संकेत देऊन फक्त भाजपला हुलकाविण्या दाखविण्याच्या खेळी सुरू केल्या आहेत. त्यासाठी या मंत्र्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे मन वळविण्याचे काम सातत्याने केले जात असल्याची माहिती शिवसेनेच्या एका राज्यमंत्र्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. शिवसेना हा तळागाळात पोहोचलेला पक्ष आहे. शिवसेनेच्या वृक्षावर भाजपची वेल वाढलेली असून, हे वेलच वृक्षाला मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातून ही वेलच उपटून गरजेचे असताना केवळ सत्ता सोपानावर अविरतपणे रहाता यावे यासाठी या ज्येष्ठ मंत्र्यांकडून या गोष्टी करण्यात येत असल्याचा आरोपही केला.
राज्यातील सत्तेत सहभागी होऊन अडीच वर्षे झाली तरी राज्यमंत्र्यांना अद्यापही अधिकार दिले जात नाहीत. त्यांच्या महत्त्वाच्या फाईली पाठविल्या जात नाहीत. सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिकांची कामे करता येत नाहीत. त्यामुळे असा बिनकामाचा सत्तेतील सहभाग काय कामाचा? असा सवाल करत युतीतून फारकत घेण्याची हीच वेळ असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
सत्ता सोडून तोटाच!
सत्ता सोडून शिवसेनेचा तोटाच होईल, असे शिवसेनेतील ज्येष्ठ मंत्र्यांचे म्हणने आहे. गेली 15 वर्षे शिवसेना सत्तेबाहेर राहिली. मतभेत सत्तेत राहूनही मांडता येतील मात्र बाहेर पडल्यास शिवसेनेच्या वचननाम्याच्या वचनपूर्ती तशाच राहतील, असे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्रिपदे मिळालेल्या ज्येष्ठ मंडळींचा सत्ता सोडण्यास विरोध आहे.
सत्तेचा उपयोग काय?
इतके मतभेद झाल्यानंतर सत्तेत राहण्यात काय अर्थ, असे शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांचे म्हणने आहे. भाजपकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. आपल्याला हवे असलेले निर्णय भाजपचे मंत्री होऊ देणार नाहीत मग अशावेळी शिवसेनेचा मराठी बाणा दाखवलाच पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. सत्ता सोडण्याच्या बाबतीत राज्यमंत्री आक्रमक आहेत.
तर ताणलेले संबंध सुधारले असते….
शिवसेना-भाजपमधील तणाव निर्माण करणार्या गोष्टींना टाळण्यासाठी आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकाराच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महिन्यातून एकदा भेटायचे ठरले होते. यास जवळपास 8 महिन्याहून अधिक कालावधी झाला तरी त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्याप वेळ दिलेला नाही. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये बैठक होऊन चर्चाच होऊ शकली नाही. त्यामुळे या दोन पक्षांचे तणाव अधिकच निर्माण झाला असून, भाजपबरोबर काम करणे आता अशक्य बनत चालल्याचे मत शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचा अतिपारदर्शकतेचा आग्रह
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यापुढे विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांनाही स्थान द्या, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी ही मागणी केली. ज्याप्रमाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पत्रकार आणि विरोधी पक्ष नेत्यांना स्थान दिले जाते, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीतही स्थान दिले जावे, अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली आहे. भाजपने ज्या पारदर्शकतेची मागणी मुंबई महापालिकेत केली आहे, तीच पारदर्शकता राज्य सरकारच्या कारभारातदेखील असावी. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पत्रकार, लोकायुक्त आणि विरोधी पक्षनेते उपस्थित असावेत, असा शिवसेना नेत्यांचा आग्रह आहे. दरम्यान, आमचे राजीनामे आजही तयार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट पहात आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशासमोर मंत्रिपद महत्त्वाचे नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.