सत्तेसाठी पंगुत्व नकोच

0

जळगाव । कें द्रासह राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असुन नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत देखील भाजपाने घवघवीत यश संपादन केले आहे. मागील दोन तीन वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा विजयाचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून, आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर देखील भारतीय जनता पार्टी एकहाती सत्ता मिळविण्याचा प्रयत्नात आहे. सत्तास्थानेसाठी कोणतेही पंगुत्व पक्षाला येवून नये असे नियोजन निवडणूकीसाठी पक्षातर्फे करण्यात आले असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंगुत्व म्हणजेच जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेसाठी कोणत्याही पक्षाशी युती करण्याची वेळ पक्षावर येवू नये असा अर्थ असून यामुळे भाजप स्वबळाची तयारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकी संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी उदय वाघ यांनी हे प्रतिपादन केले.

शिवसेनेचे दुटप्पी धोरण : आगामी काळातील निवडणूक जिंकुन सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पार्टी परिपूर्ण असून केवळ युतीधर्म पाळून भाजपा शिवसेनेशी युती करण्यासाठी तयार आहे. भाजपाने युतीसाठी मैत्रीचे हात पुढे केला असून शिवसेनेने देखील एक पाऊल पुढे येत प्रस्ताव ठेवावा तरच युती शक्य आहे. युतीबाबतची अडचण अजुन दुर झालेली नसतांना शिवसेनेने काही ठिकाणी उमेदवार घोषीत केले आहे. तसेच केंद्रासह राज्यात शिवसेना भाजपा सोबत असतांनाही शिवसेना भाजपावर नेहमी टिका करीत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी नेहमी भाजपा बद्दल उलटसुलट वक्तव्य करीत असतात. शिवसेनेच्या दुटप्पी धोरणामुळे युतीस अडचण निर्माण होत आहे.

युतीबाबत संभ्रमावस्था : जिल्हा परिषदेच्या निवडणूकीसंदर्भात युतीसाठी भाजपा तयार असून तसा प्रस्ताव देखील मित्रपक्षापूढे मांडण्यात आलेला आहे. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी युतीबाबत दोन-तीन दिवसात निर्णय होईल असे सांगितले आहे. मात्र शिवसेनेकडून युतीसाठी कोणताही प्रस्ताव येत नसल्याने आणि जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपा 67 जागेपैकी 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे धोरण ठेवले आहे. उर्वरीत 22 जागेसाठी भाजपा शिवसेनेशी युती करणार आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आम्ही मैत्रीसाठी हात पुढे केला आहे. मात्र प्रेम हे दोन्ही बाजूने असेल तसेच ‘हनीमून’ होतो असे सुचक वक्तव्य त्यांनी केले.

खडसेंची अनुपस्थिती
पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीकडे एकनाथराव खडसे व खा. रक्षाताई खडसे या अनुपस्थित होत्या. या बैठकीला ना. गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. प्रयाग कोळी, खासदार ए.टी. पाटील, आ. हरीभाऊ जावळे, आ. उन्मेष पाटील, आ. संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे, आ. चंदीलाल पटेल, आ. स्मिता वाघ, सुनील नेवे, किशोर काळकर, गोविंद अग्रवाल आदी नेते उपस्थित होते. मात्र खडसेंची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय बनली.