स्वत: सरकार बनवायचे नाही दुसऱ्यांनाही करू द्यायचे नाही हे अडेलपणाचे धोरण
मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. आज शिवसेना आमदारांची बैठक झाली. यावेळी आमदारांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी एकसुरात पाठींबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णयाची जबाबदारी सोपविली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, पुन्हा महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुखमंत्री होईल असे पुनरुच्चार केले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावी ही जनतेसह सर्व पक्षीय नेत्यांची आहे असेही संजय राऊत यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे ठरले आहे त्या शब्दाचे पालन होत नाही. सत्तेसाठी भाजपने खंजीर खुपसले आहे अशा तिखट शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर वार केले.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. भाजप आपल्या भूमिकेवर ठाम आहे का? हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा असा सवाल देखील संजय राऊत यांनी माध्यमांना केला. सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठींबा दिला. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील या विश्वासाने सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जबादारी दिली आहे. महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होताना दिसत आहे. अस्थिरता कोणामुळे निर्माण होत आहे हे महाराष्ट्राला माहित आहे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला कौल मिळाला आहे, भाजपने लवकर स्वबळावर सत्ता स्थापन करावे, त्यानंतर शिवसेना पुढील पाऊल उचलेल. स्वत: सरकार बनवायला सक्षम नसताना दुसऱ्यांनाही पुढे जाऊ न देणे हे अडेलपणाचे धोरण आहे ते भाजपाने सोडावे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. यावरून शिवसेना आता भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठींबा देणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे.