सत्यम राजपूत मृत्यूचा तपास पोलीस अधिक्षकांनी करा

0

शिंदखेडा । दोंडाईचा येथील शिवसेनेचे शहर प्रमुख चेतन राजपूत यांचे भाऊ सत्यम याचा संशयास्पद मृत्यू होवून सात महिने उलटले तरी देखील तपास शून्य आहे.तसेच घटनास्थळी आढळलेले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षकांनीच करावा अशी मागणी शिवसेनेच्या दोंडाईचा शाखेच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

तत्कालीन तपासी अंमलदारांची बदली
जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,6 डिसेंबर 2016रोजी सकाळी धुळे -दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल शिवनेरी समोर कनोरी नाल्याच्या पुलाखाली सत्यम महेंद्रसिंग राजपूत याचा मृतदेह आढळून आला. याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळावरून पोलीसांनी बजाज कंपनीची पल्सर मोटर सायकल क्रमांक एम.एच.18-एटी 1522 ही गाडी ताब्यात घेतली. सदर गाडीचे आरटीओ तपासणीची मागणी मयताचे भाऊ चेतन राजपूत यांनी केली. मात्र पोलीस स्टेशनच्या आवारातून सदर मोटर सायकल गायब झाल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. पोलीसांनी तपास केला असता मोटर सायकल प्रफुल्ल शर्मा नामक व्यक्तीकडे आढळून आली. पोलीसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेवून न्यायालयात हजर केले त्याला जामीन मिळाला आहे.

दरम्यान तात्कालीन दोंडाईचा पोलीस स्टेशनचे अधिकारी व तपासी अंमलदार यांची बदली झाली आहे. सत्यमचा मृत्यू हा संशयास्पद असल्याने घातपात असू शकतो असे निवेदनात म्हटले आहे .या घटनेला सात महिने झाले तरी अद्याप तपास शून्य आहे.या घटनेचा तपास वेगाने करावा अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमूख प्रमोद काकडे,उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे,उपतालूका प्रमुख शैलेश सोनार, शहर प्रमुख चेतन राजपूत, उपशहर प्रमुख आबा चित्ते,किरण सावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.