साक्री । येथे सत्यशोधक शेतकरी सभेच्यावतीने शेतकरी जनजागरण यात्रेची संघर्ष परिषदेचे आयोजन शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत वीज बिलासह शेतकरी कर्जमुक्ती आणि शेतमालाला रास्त भाव यासाठी सुकाणू समितीने महाराष्ट्रात यात्रेची सुरूवात केली आहे. साक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराता परिषदेला सुरूवात झाली. परिषदेपूर्वी बाल आनंदनगरी येथून रॅली काढण्यात आली.
शेतकर्यांना न्याय हक्क मिळविण्यासाठी आंदोलन
या रॅलीचे नेतृत्व राज्यव्यापी सुकाणू समितीचे नेते रघुनाथ पाटील, डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, नामदेव गावडे, संजय पाटील, सुशिला मोराळे आदींनी केले. ही रॅली मुख्य बाजारपेठ, सुभाष चौक, सोनार गल्ली, संतोषी माता चौक, बस स्थानक रोड, राष्ट्रीय महामर्गावरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अवारात आली. यानंतर रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले. यावेळी सभेत विविध शेतकरी हिताचे ठराव मांडून मंजूर करण्यात आले. यात शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा, उत्पादन खर्चांवर आधारीत शेतमालाला भाव जाहीर केला पाहिजे. शेतकर्यांचे शेतीची थकलेले विज बिल माफ करा, शेतकर्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत. वनहक्क दावे मंजूर करावे हे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना रघुनाथ पाटील यांनी सांगितले की,जो पर्यंत राज्यशासन सर्व शेतकर्यांचे सात बारा कोरा करणार नाही तोपर्यंत सुकाणू समिती संघर्ष यात्रा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस लागू करण्याचा प्रयत्न करणार आहेत. शेतकर्यांना न्याय हक्क मिळविण्यासाठी आंदोलन उभारले जाणार आहे.