चोपडा । तालुक्यातील सत्रासेन येथे शेती शिवारात चोरीच्या उद्देशाने आलेल्या तीन संशयित चोरांना ग्रामस्थांनी पाठलाग करून, पकडले. त्यांना गावात आणून जबरदस्त मारहाण केली. यात तिघे चोरटे जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने, त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान एक चोरटा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. सत्रासेन शेतीशिवारात केबल चोरीच्या उद्देशाने चार चोरटे दुचाकीवर आले होते. मात्र रात्रीच्यावेळी शेतात राखण करणार्या शेतकर्याने त्यांना हटकले असता, ते दुचाकी घेऊन पळू लागले. शेतकर्याने गावात फोन करून, ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी शेताच्या दिशेने धाव घेतली.
पोलीसांनी जखमींचा घेतला जबाब
ग्रामस्थांनी चोरट्यांचा जवळपास अडीच किलोमीटर पर्यंत पाठलाग केला. चौघांपैकी कैलास पेरसिंग भिलाला (32), भायास विपला भिलाला (37) , राजाराम फुलसिंग भिलाला (21) या तीन संशयितांना ग्रामस्थांनी उत्तमनगरजवळ पकडले. ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप दिला. त्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सत्रासेनला जाऊन तिघ संशयितांना ताब्यात घेतले. सकाळी 6 वाजेच्या सुमारास चोपडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी प्रथमोपचार केले. संशयितांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने, त्यांना जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी जखमींचे जबाब घेतले आहेत. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणाविरूद्ध गुन्हा दाखल झालेला नाही.