सत्संग कुणाचा… ताप कुणाला?

0

वाघोली । पुणे-नगर महामार्गावर केसनंद येथील सत्संग कार्यक्रमामुळे चार ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूकोंडी झाली होती. त्यातून विद्यार्थी, नोकरदार, वाहनचालक यांना मोठी कसरत करावी लागली.

केसनंद येथील सत्संग कार्यक्रमामुळे शुक्रवारी (दि.17) सकाळी 7 च्या सुमारास नगर रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. ही कोंडी सत्संगासाठी आलेल्या सदस्य आणि भक्तांच्या वाहनांमुळे झाली होती. लोणीकंद पोलिस व सत्संगच्या कार्यकर्त्यांचे वाहतूक नियंत्रणाचे मोठ्या शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या कार्यक्रमाला येणार्‍या वाहनांची संख्याच प्रचंड असल्याने पोलिसांचे व कार्यकर्त्यांचे नियोजनही कोलमडून गेले. पुणे-नगर रस्त्यावरील या वाहतूककोंडीत सत्संग प्रमुख गुरिंदर सिंगजी धिल्लोनमहाराज ही अडकून पडले होते. शुक्रवारी केसनंद येथील राधा स्वामी सत्संगच्या वतीने येथील केंद्रात सत्संगचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी दोनपर्यंत हा कार्यक्रम होता. यासाठी अनेक राज्यातून या सत्संगाचे अनुयायी आले होते.

सकाळपासून अऩुयायी येण्यास सुरुवात झाली. यामुळे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक नियोजन कोलमडले होते. खराडी बायपासपासून ते कटकेवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सत्संग प्रमुख गुरिंदर सिंगजी अकरा वाजता कार्यक्रमासाठी निघाले. मात्र त्यांनाही खांडवेनगरपासूनच वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. शेवटी पोलिसांनी त्यांचा ताफा कोंडीतून बाहेर काढून त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचविले.