सदनिकांच्या किमतीत 4.01 टक्क्यांनी घसरण

0

पुणे| वस्तू व सेवाकर (जीएसटी), रेरा लागू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात बांधकाम व्यवसायात तेजी येईल, असे वाटत असताना शहरातील बांधकाम उद्योग अद्यापही ठप्पच असल्याचे वृत्त आहे. गतवर्षीपेक्षा सदनिका व घरांच्या किमतीत 4.01 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. 2016 मध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सरासरी 4900 प्रति वर्गफूट असे घरांचे दर होते. 2017मध्ये हे दर घसरून आता 4786 रुपये प्रति वर्गफूट असे झाले आहेत. तसेच, नवीन प्रकल्प सुरु करण्यातही 26 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. बाजारपेठेतील ही मंदी दूर होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागेल, असेही तज्ज्ञ म्हणाले.

ग्राहकांना हवीत स्वस्त घरे
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात 2016च्या दुसर्‍या सहामाहीत 4 लाख 7 हजार 119 नवीन सदनिका बांधण्यास सुरुवात झाली होती. जेव्हा की, 2017च्या पहिल्या सहामाहीत 3 लाख 4 हजार 803 सदनिकांच्या बांधणीस सुरुवात झाली. त्यामुळे पहिल्या सहामाहीपर्यंत बांधकाम व्यवसायात सरासरी 26 टक्क्यांनी घट दिसून आली. गत तीन वर्षांचा विचार करताना या शहरातील बांधकाम व्यवसायात सरासरी 22 टक्क्यांनी घट झाली असून, लक्झरी घरांच्या सेगमेंटमध्ये 40 टक्क्यांनी घट नोंदविली गेली आहे. 2017च्या पहिल्या सहामाहीत 16.01 टक्केच घरांची विक्री झाली. स्वस्त घरांच्या योजनांना ग्राहकांची पसंती असून, लक्झरी प्रकल्प हाती घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नवीन प्रकल्पांची संख्याही घटली
गतवर्षी सदनिका व घरांच्या किमती स्थीर होत्या. परंतु, नोटाबंदीच्या कालावधीनंतर त्यात आणखी घसरण झाली. वर्षभरात सरासरी 4.01 टक्क्यांनी सदनिका व घरांच्या किमतीत घसरण झाल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. या परिसरात जुलै 2015 ते जून 2016 या कालावधीत 1 लाख 02 हजार 36 सदनिका व घरांच्या योजनांना सुरुवात झाली होती. जुलै 2016 ते जून 2017 मध्ये नवीन प्रकल्प सुरु होण्यात मात्र मोठी घसरण झाली. या कालावधीत केवळ 81 हजार 922 नवीन सदनिकांची कामे सुरु झाली होती. तसेच, किमतीत दिडशे ते दोनशे रुपये प्रति वर्गफूटच्या दराने घसरण झाली होती. त्यामुळे बांधकाम व्यावसाय प्रचंड अडचणीत आला असून, तो सुरुळीत होण्यासाठी बराच कालावधी लागेल, असेही तज्ज्ञांनी सांगितले.