सदाभाऊंचा ‘स्वाभिमानी‘ला रामराम?

0

पुणे : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकण्याचा निर्णय शुक्रवारी कार्यकर्त्यांसमोर जाहीर केला. या पुढे कोणत्याही समितीपुढे जाणार नाही. जाणार तर केवळ शेतकर्‍यांत जाणार, अशी भूमिका घेत सदाभाऊंनी कार्यकर्त्यांशी बोलताना आपला पुढचा मार्ग स्पष्ट केला. ‘आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पूर्णविराम’, असे सूचक वक्तव्य करूनच ते चौकशी समितीशी चर्चा करायला गेले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडण्याची चिन्हे आहेत. पुढील महिन्यात राज्यभर दौरे आखून अंतिम निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी दुसरीकडे जाहीर केले. सदाभाऊंनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी द्रोह केला, या आरोपाखाली संघटनेने त्यांची चौकशी करण्याकरीत समिती नेमली होती. या समितीच्या चौकशीला ते पुण्यात समोरे गेले होते.

खा. शेट्टी-ना. खोत यांच्यात फाटले!
सदाशिव खोत यांना राज्यमंत्रिपद देण्यात आल्यानंतर काही महिन्यांतच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. सत्तेत सहभागी होताच खोत संघटनेचे आणि शेतकर्‍यांचे प्रश्न विसरले, असा आरोप शेट्टी आणि त्यांचे समर्थक करत होते. परिणामी, एकेकाळच्या या जिगरी दोस्तांमधील दरी वाढत गेली. वाद इतका विकोपाला गेला की, वडिलांच्या आजारपणासाठी दिलेल्या उसन्या पैशाचे ‘हिशोब’ही त्यांनी जाहीरपणे चुकते केले. त्यानंतर, गेल्या महिन्यात राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई अशी पायी आत्मक्लेश यात्रा काढली होती. त्यात खोत सहभागी झाले नव्हते. त्यावेळी, खोत यांच्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ, असे सूचक विधान शेट्टींनी केले होते. खोत यांची स्वाभिमानीमधून हकालपट्टी होणार आणि ते भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या महिन्यात रंगली होती. परंतु, त्यापैकी काहीच झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीशी चर्चा करण्याआधी सदाभाऊंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतकर्‍यांना भावनिक साद घातली आणि संघटना सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले.

चौकशी समितीला दिली सविस्तर उत्तरे!
सदाभाऊंची पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये चौकशी घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष प्रा. पोपळे, रवीकांत तुपकर, दशरथ सावंत, सतिश काकडे हे समितीतील सदस्य सदाभाऊंना भेटले. समितीने त्यांना 21 प्रश्न विचारले होते. या सर्व प्रश्नांची सदाभाऊंनी आधीच लिखित उत्तरे तयार ठेवली होती. त्याच प्रत समितीच्या सदस्यांना देण्यात आली. संघटनेशी आपण कुठलाही द्रोह केला नसल्याचा दावा खोत यांनी केला. भाजपशी संघटनेने युती केली होती. मंत्री म्हणून मला जबाबदारी मिळाली. सरकारमध्ये गेल्यानंतर रस्त्यावर येऊन आंदोलकांची भूमिका घेणे शक्य नव्हते. तरीही आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील दुवा बनण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले, अशी भूमिका खोत यांनी समितीसमोर मांडली. समितीसमोर जाण्यापूर्वी खोत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांनीही आपली भूमिका या वेळी मांडली. तुटेपर्यंत ताणू नये, असा सल्ला बहुतेकांनी दिला. मात्र तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य राहील, असेही सदाभाऊंना सांगितले. आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पूर्णविराम. ऑगस्ट महिन्यापासून राज्यभर दौरा करू आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे शिबिर घेऊ. स्वतंत्र संघटना उभारावी ही कार्यकर्त्यांची मागणी आहे. तुम्ही कार्यकर्तेच मायबाप आहात. तुमच्यामुळेच खुर्चीत बसलोय. मी संघटनेच्या विरोधात कुठलेही काम केलेले नाही, अशी भूमिका सदाभाऊंनी मांडली. त्यामुळे आता ते काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.