कोल्हापुरात रयत क्रांती संघटना नावाने नव्य संघटनेची घोषणा
मुंबई : स्वभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत जोरदार वादंग उठल्याने अखेर खूप दिवसापासून चर्चेत असलेली कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची नवीन संघटनेची घोषणा झाली आहे. रयत क्रांती संघटना नावाने आज, गुरुवारी कोल्हापुरात याची घोषणा ना. खोत यांनी केली. ही संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारशी संवादाचा सेतू असेल असे खोत यांनी सांगितले. स्वाभिमानी संघटना चालविण्यासाठी जनतेतून झोळी टाकून मदत उभा करणारे सदाभाऊ खोत या नव्या रयत क्रांती संघटनेसाठी नेमकी झोळी कशी भरणार? असा सवाल समर्थक आणि शेतकरी आंदोलकांमधून उपस्थित केला जात आहे. सत्ता सोडायला तयार नसल्याने सदाभाऊ खोतांची स्वभिमानीतून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर भाजपसोबत न जाता वेगळ्या संघटनेची स्थापना करणारे सदाभाऊ संघटनेची आर्थिक बाजू कशी सांभाळणार याकडे आता लक्ष लागून आहे.
कोल्हापुरात रयत क्रांती संघटनेची घोषणा करताना त्यांनी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले. आमच्या नव्या संघटनेचे कार्यकर्ते हे आरोग्यदूत, जलदुत, स्वच्छतादूत बनून कार्य करणार आहेत. आत्महत्यांच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचे काम संघटना करणार असल्याचे खोत यावेळी म्हणाले. या संघटनेसाठी त्यांना भाजपच्या काही नेत्यांकडून आर्थिक पाठबळ मिळत असल्याच्याही चर्चा आहेत. मात्र जर त्यांनी स्वाभिमानीप्रमाणे झोळी टाकली तर त्यांना मदत मिळेल काय? हे देखील पाहण्याजोगे आहे. शेट्टी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर सदाभाऊ हे भाजपमध्ये जातील असा कयास बांधला जात होता मात्र त्यांनी तसे न करता नवी संघटना स्थापन केली. नवी संघटना स्थापन केली असली तरी सध्या ते भाजपचे आमदार आहेत आणि पर्यायाने भाजपचेच मंत्री देखील आहेत.