पुणे : राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शेतकर्यांबद्दलच्या त्यांच्या निष्ठा संशयास्पद असल्याचे कारण देत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पक्षाच्या चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सोमवारी ही घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाल्यानंतर पक्षाच्या कोट्यातून खोत यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते. मात्र, सरकारमध्ये गेल्यानंतर ते संघटनेपासून दूर गेले. त्यातून संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते. कर्जमुक्तीसाठी राज्यातील शेतकर्यांनी काढलेल्या मोर्चाच्यावेळी खोत यांनी सरकारला अनुकूल भूमिका घेतल्याने हे मतभेद आणखी तीव्र झाले. तेव्हापासून खोत यांच्या हकालपट्टीची चर्चा होती. आजवर सदाभाऊ यांनी केलेले काम लक्षात घेता आणि त्यांच्यावर काही दिवसांत झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तात्काळ निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यावरील होणार्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे, असे सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सदाभाऊ हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून मंत्रिपदावर आहेत. त्यांचे पद काढून घेण्यात यावे याविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचीही माहिती यावेळी सावंत यांनी दिली.
सदाभाऊंना सत्तासुंदरीचा मोह!
सदाभाऊ खोत यांना सत्तासुंदरीचा स्पर्श झाल्याने मोह सोडविला जात नाही, अशी खोचक टीका करत सरकारमध्ये राहण्याबाबतचा निर्णयही आठवड्याभरात घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश फोफळे यांनी सांगितले. तर कार्यकारिणीची सभा घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याबाबत ठरविण्यात येणार असल्याचे दशरथ सावंत यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. खोत हे संघटनेच्या कोट्यातून मंत्री झालेले होते. त्यामुळे सदाभाऊंचा राजीनामा मागणार असल्याचे सावंत म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. भाजपने खोत यांना मंत्रिपद दिल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. सत्तेत सहभागी होताच खोत संघटनेचे आणि शेतकर्यांचे प्रश्न विसरले, असा आरोप शेट्टी यांनी केला होता. दरम्यान, सध्या मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
खोतांवरील आरोपांमुळे संघटनेची बदनामी
सदाभाऊ खोत व खा. राजू शेट्टी यांच्यात मतभेद वाढल्यानंतर पक्षशिस्त भंगाचा आरोप खोत यांच्यावर ठेवण्यात आला होता. गेल्या महिन्यात खा. शेट्टी यांनी पुणे ते मुंबई अशी पायी आत्मक्लेश यात्रा काढली होती. त्यात खोत सहभागी झाले नव्हते. त्यावेळी, खोत यांच्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ, असे सूचक विधान शेट्टींनी केले होते. त्यानंतर खोत यांची बाजू ऐकून घेण्यासाठी दशरथ सावंत यांच्या नेतृत्वात चौकशी समितीही गठीत करण्यात आली होती. खोत यांनी या चौकशी समितीसमोर आपले म्हणणेही मांडले होते. मात्र, त्यानंतरही ते संघटनेपासूनच अंतर राखून होते. परिणामी, त्यांना संघटनेतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. खोत यांच्यावर सातत्याने होणार्या आरोपांमुळे संघटनेची बदनामी होत आहे, असा दावा सावंत यांनी केला. खोत यांनी तात्काळ मंत्रिमंडळातील जागा रिकामी करावी, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच, सरकारमध्ये राहायचे की नाही, याचा निर्णय आठ दिवसांत घेतला जाईल, असेही सावंत म्हणालेत.
महिलेने केला होता लैंगिक शोषणाचा आरोप
सदाभाऊंनी चौकशी समितीसमोर जाण्यापूर्वीच नवीन संघटना काढण्याचे सुतोवाच केले होते. ते पुढील रणनीती आखत असतानाच सांगलीतील एका पत्रकार महिलेने सदाभाऊंवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. त्यासंबंधीची पत्रकार परिषदही घेतली होती. तसेच पोलिस ठाणेही गाठले. हे प्रकरण त्यांनी कसेबसे मिटवले होते. तोपर्यंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महिलेच्या शोषणाचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदाभाऊंची बाजू मांडावी लागली. याप्रकरणातील महिलेने तक्रार नसल्याचे लिहून दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर लगेचच त्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला. आपण मॅनेज नसल्याचे, तसेच दबाव आणून पोलिसांनी तक्रार नसल्याबात लिहून घेतल्याचे त्या महिलेने म्हटले आहे. त्यामुळे त्या महिलेची टांगती तलवार सदाभाऊंवर कायम आहे. या प्रकरणी विरोधकांनी सदाभाऊ आणि संघटनेवर जोरदार टीका केली होती. सदाभाऊंच्यामुळे संघटना बदनाम झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आता या सार्या पार्श्वभूमीवर सदाभाऊ पुढील काय पावले उचलणार, याकडे आता लक्ष आहे.