सदाभाऊंच्या ताफ्यावर दगडफेक

0

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

सोलापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर माढा तालुक्यातील रिधोरे बसस्थानकासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यानी शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास दगडफेक केली. सदाभाऊ गाडीने बार्शीकडे जात असताना कुर्डूवाडी टोलनाक्यावर स्वाभिमानीच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत गाडीवर गाजर, मका, तूर फेकली व घोषणा दिल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले व काही जणांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

खोत यांच्या सुरक्षेत वाढ
सदाभाऊ खोत हे पंढरपूरहून कुर्डूवाडी बार्शी मार्गावरुन पुढे जात असताना रिधोरे गावातील रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सत्कार स्विकारण्यास ते थांबले होते. दरम्यान, सत्कार स्विकारण्यास उतरले असता रिधोरे गावातीलच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत याच्या शासकीय गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीच्या काचा फुटल्या. मात्र, सदाभाऊ खोत यांना काहीही झाले नाही, ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, संघटक महावीर सावळे, सिध्देश्‍वर घुगे, बापू गायकवाड, सत्यवान गायकवाड यांना ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर सदाभाऊंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

स्वाभिमानीचा विरोध वाढू लागला
सदाभाऊ मंत्री झाल्यानंतर शेतकर्‍यांना विसरले, शेतकर्‍यांबद्दलची त्यांची आस्था लोप पावली, या संतापातूनच हा हल्ला झाल्याचे सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी गारपीटग्रस्त जालना जिल्ह्याच्या दौर्‍यावेळीदेखील सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना काळे झेंडे दाखवत, तीव्र विरोध केला होता. त्या धास्तीने सदाभाऊंना आपला गारपीटग्रस्त भागाचा दौरा अर्धवट सोडून परतावे लागले होते.