मुंबई (निलेश झालटे) । स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत ताणलेल्या संबंधानंतर आणि खुलासा मागितल्याने नाराज झालेले कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत शेतकर्यांसाठी आपली स्वतःची संघटना उभारण्याची तयारी करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. शेतकरी आंदोलनात सरकारशी समन्वय साधण्यात समाविष्ट असलेले जयाजी सूर्यवंशी यांच्यासह सुकाणू समितीवर नाराज अन्य शेतकरी नेते सदाभाऊंच्या सोबत असल्याची माहिती मिळाली आहे. या नव्या संघटनेसंदर्भात सदाभाऊंच्या बैठकावर बैठका सुरू आहे. तर दरम्यान खा. शेट्टी यांनी मागील बैठकीत मागितलेल्या खुलाशाला उत्तरे देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आहे.
लवकरच चित्र स्पष्ट
शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात संघटनेसोबत न राहता सरकारचे प्रतिनिधित्व केल्यामुळे सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला होता. सदभाऊंच्या या भूमिकेमुळे कार्यकर्तेदेखील त्यांच्यावर नाराज असल्याचे पुण्यातील बैठकीत दिसून आले होते. याचमुळे त्यांना 21 जुलैपर्यंत खुलासा करण्याबाबत शेट्टी यांनी सूचना दिल्या आहेत. या खुलाशाला उत्तर दिले तरी स्वाभिमानीतून सदाभाऊ यांची गच्छंती अटळ असून 21 तारखेनंतर नव्या संघटनेबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. शेतकर्यांच्या हितासाठी स्वाभिमानाच्या नावाशी साधर्म्य असणारी ही नवी संघटना असणार आहे.
आंदोलनातील नेते साथीला!
सदाभाऊ खोत यांच्या या नव्या संघटनेत शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात सरकारच्या सोबत असलेले आणि सुकाणू समितीवर नाराज असलेले शेतकरी नेते साथीला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेतकरी आंदोलनात आरोप झालेले जयाजी सूर्यवंशी, संदीप गिड्डे तसेच धनंजय जाधव हे सदाभाऊ यांच्यासोबत असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान यासंदर्भात सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क ’नॉट रीचेबल’ येत होता. ते सध्या निसर्गोपचार केंद्रात उपचार घेत असल्याचे समजते. दरम्यान, किसान क्रांती मोर्चाचे संदीप गिड्डे यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, “सदाभाऊ दुसरी संघटना काढत आहेत याबद्दल सोशल मीडियातून ऐकायला मिळाले आहे. शेतकरी आंदोलक असल्यामुळे आम्हाला त्यांचे विचार आवडतात. ते संघटना काढत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.”