सदाभाऊ घेताहेत पुण्याजवळील निसर्गोपचार केंद्रात उपचार!

0

मुंबई | कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत सध्या पुण्याजवळील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेत आहेत. तिथूनच त्यांनी नवी शेतकरी संघटना उभारण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सरकारसोबत असल्याचा आरोप झालेले, सुकाणू समितीवर नाराज शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी, संदीप गिड्डे तसेच धनंजय जाधव हे सदाभाऊ यांच्यासोबत असतील अशी चर्चा आहे. सदाभाऊ खोत ‘नॉट रीचेबल’ असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात संघटनेसोबत न राहता सरकारचे प्रतिनिधित्व केल्यामुळे सदाभाऊ आणि स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला होता. दोघातील संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. सदाभाऊंच्या सरकारधार्जिण्या भूमिकेमुळे कार्यकर्तेदेखील त्यांच्यावर नाराज असल्याचे संघटनेच्या पुण्यातील बैठकीत दिसून आले होते.

खुलासा मागितल्याने नाराज
सरकारधार्जिण्या भूमिकेबद्दल राजू शेट्टी यांनी खोत यांच्याकडून मागील बैठकीत खुलासा मागितल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांना 21 जुलैपर्यंत खुलासा करण्याबाबत शेट्टी यांनी सूचना दिल्या आहेत. खुलाशालाची उत्तरे देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या खुलाशानंतरही सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून गच्छंती अटळ असल्याचे मानले जातेय.

21 जुलैनंतर ठरेल पवित्रा
‘स्वाभिमानी’तून सदाभाऊ यांच्या गच्छंतीबाबत काय निर्णय होतो यावरच त्यांचा नव्या संघटनेबाबत पवित्रा ठरणार आहे. स्वाभिमानाच्या नावाशी साधर्म्य असणारी ही नवी संघटना असेल, असे बोलले जातेय. सरकारधार्जिण्या भूमिकेमुळे ‘स्वाभिमानी’पासून वेगळे होण्याची वेळ आलेल्या नेत्यांची ही नवी संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार आहे.

सदाभाऊ दुसरी संघटना काढत आहेत, याबद्दल सोशल मीडियातून कळतेय. शेतकरी आंदोलक असल्यामुळे आम्हाला त्यांचे विचार आवडतात. ते संघटना काढत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
– संदीप गिड्डे,किसान क्रांती मोर्चा