पुणे । लोणी-व्यंकनाथ व बाबुर्डी (ता. श्रीगोंदा) या गावातील 27 शेतकर्यांनी एका व्यापार्यामार्फत सोलापूर जिल्ह्यातून खरबूजाची रोपे आणून लागवड केली. शेतकर्यांनी या पिकासाठी एकरी 70 हजार रुपये खर्च केला होता. मात्र लागवडी नंतर दीड महिना उलटूनही अद्यापपर्यंत फळ लागण झालेली नाही. तब्बल अर्धा कोटीचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दोषींवर कारवाई नाही
शेतकर्यांनी कृषी अधिकार्यांकडे तक्रारही नोंदवली त्यानुसार तालुका कृषी अधिकार्यांनी पाहणी करून बियाणे सदोष असल्याचे सांगितले. व्यापार्यानेही बियाणे खराब असल्याचे सांगत काढता पाय घेतला. मात्र हे नवे संकट शेतकर्यांच्या जीवावर बेतले असल्याने तब्बल 27 शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकर्यांना न्याय देण्याकरिता कृषी विभागामध्ये गुणनियंत्रण शाखेची निर्मिती केलेली आहे. मात्र दुर्देवाने दोषींवर कठोर कारवाई केली जात नाही. कारवाई करण्याऐवजी गुणनियंत्रक निरीक्षक कंपनी व दुकानदार आपसी आर्थिक तडजोड करतात.शेतकर्यांना बियाणे कायदा व गुण नियंत्रनाची कार्यपद्धती, बियाणे उत्पादन व विक्रीची परवाना पद्धत माहित नसते. परिणामी हवालदिल शेतकरी आर्थिक संकटात सापडतो.
शासनाने कठोर कारवाई करावी
शेतकर्यांनी संबंधित व्यापार्याला व कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे व पथकाला पाहणी करीता बोलाविले. मात्र अधिकार्यांनी बियाणे सदोष असल्याचा निर्वाळा दिला. संबंधित व्यापार्याला शेतकर्यांनी कृषी अधिकार्यांकडे तक्रार नोंदविण्यास भाग पाडले. मात्र व्यापार्याने बियाणे खराब असल्याचे सांगत काढता पाय घेतला. त्यानंतर शेतकर्यांनी कारवाईची इशारा दिला असता व्यापार्याने कृषी विभागात तक्रार दाखल केल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची शासनाने चौकशी करून शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी श्रीगोंदा येथील शेतकरी करीत आहेत. दोषी कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच शासनाने धडक कारवाई करावी जेणेकरून कृषी निविष्ठा उत्पादन करणार्या कंपन्या गुणवत्तापूर्ण निविष्ठांचे उत्पादन करतील व शेतकर्यांचे अवास्तव नुकसान होणार नाही.
शेतकर्यांच्या मागण्या
गुण नियंत्रण निरीक्षकांनी संबंधित बियाण्याची ग्रो आउट टेष्ट प्रयोगशाळेतून करून घ्यावी व या चाचणीचा निकाल येईपर्यंत विक्री बंदी आदेश देण्यात यावेत. रोपवाटिकेची तपासणी झाली होती का? याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करून शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा अशा मागण्या शेतकर्यांनी केल्या आहेत.
सदोष बियान्यांमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. ही बाब श्रीगोंदे येथील तालुका कृषी अधिकार्यांनी कृषी आयुक्तालयाला त्वरित कळविणे आवश्यक आहे. तसेच कृषी आयुक्तालयाने सर्व जिल्ह्यांना याची माहिती देऊन संबंधित वानाचा नमुना घेणे व त्या वाणाची विक्री बंद करून कारवाईचे आदेश द्यावे.
– जालिंदर सुद्रिक