पुणे : सद्याच्या युगात ज्ञानाचेच वर्चस्व राहणार असून, ज्ञान हेच खरे चलनी नाणे आहे असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी स्पष्ट केले. पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ आणि संचलन कार्यक्रम राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेमधून घेतलेल्या ज्ञानाचा अधिकार्यांनी पूर्णत: उपयोग करावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. अद्ययावत तांत्रिक ज्ञान ठेवणे ही काळाची गरज आहे. या संस्थेतून मिळालेले तांत्रिक ज्ञान अधिकार्यांना यापुढच्या वाटचालीमध्ये येणार्या आव्हानांना तोंड देण्यास नक्कीच उपयोगी पडणार आहे असे सांगून, राष्ट्रपती मुखर्जी यांनी संस्था लवकरच 75 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे याबद्दल आनंद व्यक्त केला.
69 अधिकार्यांना राष्ट्रपतींच्याहस्ते पदवीप्रदान
महाविद्यालयाच्या सर्वत्र सभागृहात झालेल्या शानदार पदवीदान समारंभात तंत्रज्ञानाची मास्टर पदवी घेणारे पाच अधिकारी, अभियांत्रिकी अभ्यास क्रमाची पदवी घेणार्या 35 अधिकारी आणि तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाची पदवी घेणार्या 29 अधिकार्यांना राष्ट्रपतींच्याहस्ते पदवी बहाल करण्यात आली. या सर्व अधिकार्यांना नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची पदवी देण्यात आली. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, लेफ्टनंट जनरल डॉ. सोनी (व्हीएसएम), लेफ्टनंट जनरल सुरेश शर्मा (एव्हीएसएम), जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एम. जगदेश कुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दीक्षांत समारंभाला लष्कराचे अधिकारी, महिला, विद्यार्थ्यांचे पालक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अमृतमहोत्सवी वर्ष
अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत राहताना सातत्याने नवनवीन कौशल्य शिकून घेण्याची आणि बदलत्या काळाबरोबर आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडर लेफ्टनंट जनरल मिशेल मॅथ्यूज (व्हीएसएम) यांनी यावेळी केले. पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अव्वल दर्जा, अभ्यासक्रमामधील उत्कृष्टता गेल्या 75 वर्षापासून कायम टिकून आहे असे सांगून, मॅथ्यूज यांनी या महाविद्यालयाला असलेल्या 75 वर्षांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती आपल्या भाषणातून दिली. कार्यक्रमात लेफ्टनंट कर्नल रोहित ओबेरॉय, कॅप्टन विजयकुमार यादव आणि लेफ्टनंट मनीष कुमार या गुणवत्ताधारक अधिकारी अभियंत्यांना विशेष पदक देऊन गौरविण्यात आले.