समाजवादी कार्यकर्ते सुभाष वारे याचे मत
पिंपरी-चिंचवड : धर्माच्या व जातीच्या आधारावर येथील व्यवस्थेचा डोलारा उभा राहिला असून संविधानासमोर हे मोठे आव्हान आहे, असे मत समाजवादी कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. येथील पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट व संविधानदिन सोहळा समितीच्या वतीने ‘भारतीय संविधान जनजागरण अभियान‘ आयोजित केले आहे. यामधील सातव्या सत्रामध्ये ते ‘भारतीय संविधान समोरील आव्हान’ या विषयावर बोलत होते. सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज अभियानचे महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे होते.
समानतेसाठी आरक्षण आवश्यक
वारे म्हणाले, संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी करताना सर्व जातीधर्माच्या स्त्री पुरूषांना सन्मानाची हमी व विकासाची संधी दिली गेलेली नाही. त्यामुळे भारतातील गरिबांची अधिकाधिक संख्या वाढली. आणि ते उपेक्षित राहण्याचे कारण यामध्ये दडलेले आहे. शिवाजी महाराजांच्या रयतेचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता व शक्ती संविधानात आहे. मात्र कर्मठ व धार्मिक किनार लाभल्यामुळे हे शक्य होताना दिसत नाही. विशिष्ट जातींच्या किंवा विशिष्ट कुटुंबासाठी आरक्षण नाही, तर ते समानतेसाठी आवश्यक आहे. यासाठी गणती समानता नाही, तर जैविक समानता संविधान मान्य करते असा दाखला त्यांनी यावेळी दिला.
संविधान उघडण्याचे कामे : कांबळे
अध्यक्षीय भाषणात मानव कांबळे यांनी, संविधानाची चौकट कायम ठेऊन घटना बदलण्याचे षडयंत्र आपण ऐकेत होतो. परंतू आता तर उघड उघड चौकटच मूळासकट काढून टाकण्याचा कार्यक्रम राज्यकर्त्यांनी हाती घेतला असल्याचे त्यांनी म्हटले. कार्यक्रमाला प्रा. राजाभाऊ भैलुमे, शरद जाधव, विजय कांबळे, प्रभाकर ओव्हाळ, विजय जगताप आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. ज्ञानदेव रणसूर यांनी केले, तर विष्णु मांजरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दीपक गायकवाड यांनी आभार मानले.