सनदी अधिकारी होऊन देशाची सेवा करा – धर्माधिकारी

0

महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन

पिंपरी : हाती घेतलेल्या कामावर श्रद्धा ठेवा. त्या कामाला न्याय द्या. वागण्या बोलण्याचे मॅनर्स असणे गरजेचे आहे. शिष्टाचाराला अत्यंत महत्व आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या भल्यासाठी शासन काम करते. हाती घेतलेल्या कामाला कमिटमेंट दिल्याप्रमाणे ते काम प्राधान्याने पूर्ण करावे. सनदी अधिकारी होऊन प्रशासनाच्या माध्यमातून देशाची सेवा करा. घेतलेल्या कामाचा ध्यास घ्या. विषयाचा अभ्यास करताना विषय पूर्णपणे कळावा यासाठी मेहनत घ्यावी. वेळापत्रक तयार करून आठ ते दहा तास अभ्यास करावा. उत्तम अभ्यास करण्यासाठी नियोजन करून अभ्यास करावा. अभ्यासात व कामात नियोजन व शिस्त ठेवल्यास सफलता प्राप्त होते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पर्धा परिक्षा केंद्राच्यावतीने एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. स्पर्धा परिक्षेचा ÷अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सह आयुक्त दिलीप गावडे, सहा. आयुक्त आशादेवी दुर्गुडे यांच्या हस्ते धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासन अधिकारी राम किसन लटपटे, ग्रंथपाल प्रतिभा मुनावत, वर्षा जाधव, दिलीप धायगुडे व सुशिला कलापुरे आदी उपस्थित होते.

नोटस् काढणे स्किल!
धर्माधिकारी पुढे म्हणाले की, ध्येय, जिद्द, चिकाटी अंगी बाळगुन अभ्यास केल्यास यश हमखास मिळते. नोटस् काढणे हे स्किल आहे. व्याख्यान ऐकणे हे स्किल आहे. आयत्या वेळी भाषण श्रवण करून नोटस् काढणे हे कौशल्य आहे. कमी वेळात जास्त प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करा. अभ्यास करताना हाती घेतलेल्या कामावर श्रद्धा ठेवा. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त, चिकाटी व समर्पण या गोष्टी आवश्यक आहेत. नोटस् काढणे म्हणजे आपल्या मेंदूत एंटर आणि सेव्ह करणे आहे.

उत्तम वाचन व श्रवण कौशल्य!
अभ्यास करताना विषय कळणे महत्वाचे असते. विषय समजावून घ्यावा. उत्तम वाचन. वेगाने वाचन व श्रवण कौशल्य या गोष्टींवर भर असावा. उत्तम अभ्यास करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करणे आवश्यक आहे. मनापासून अभ्यास केल्यास यश हमखास मिळते. जी. एस. व सी. सॅट करीता उत्तम गाईड वापरावे. दहा हजार बहुपर्यायी प्रश्‍नसंच सोडविणे आवश्यक आहे. तसेच प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍न कसे सोडवायचे याचे तंत्र धर्माधिकारी सरांनी सोप्या भाषेत विषद केली.

सह आयुक्त दिलीप गावडे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल राजू मोहन यांनी केले तर सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले. आभार ग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वार यांनी केले.