‘सनबर्न’ कार्यक्रमाचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द

0

बावधन । मुळशी तालुक्यातील बावधन आणि लवळ गावाच्या हद्दीत ‘सनबर्न’ कार्यक्रम पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आयोजित केला आहे. हा कार्यक्रम रद्द करावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यामुळे लवळे ग्रामपंचायतीने या कार्यक्रमास दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले असल्याची माहिती सरपंच विद्या क्षीरसागर यांनी दिली.

‘सनबर्न’ हा कार्यक्रम ज्या परिसरात आहे तेथे लागून 500 मीटरवर संरक्षण मंत्रालयाच्या एचईएमआरएल हा अतिसंवेदनशील भाग आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द व्हावा, यासाठी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना नगरसेवक किरण दगडे-पाटील व बावधनच्या सरपंच पियुषा दगडे-पाटील यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळी ग्रामसदस्य सचिन दगडे-पाटील, आझाद दगडे, शितल सचिन दगडे, प्रदीप दगडे, सचिन शंकरराव दगडे हे उपस्थितीत होते.लवळे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विद्या क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली लवळे येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्यानुसार सर्व ग्रामस्थांनी ठराव करून ‘सनबर्न’ कार्यक्रमाला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचे ठरले. यास विजय शितोळे हे सूचक तर भरत शिंदे अनुमोदक म्हणून सर्वांच्या मते हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भात सरपंच व उपसरपंच वैभव कुदळे यांनी सांगितले, पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केलेल्या ग्रामपंचायतीला अर्जात सनबर्न या कार्यक्रमाचा उल्लेख नव्हता. केवळ संगीतमय कार्यक्रमासाठी परवानगी पाहिजे फक्त असे लिहिले होते. त्यामुळे कंपनीने ग्रामपंचायतीची दिशाभूल केल्याचे लक्षात आल्याने विशेष ग्रामसभा घेऊन दिलेले ना हरकत प्रमाणपत्र सर्वानुमते रद्द करण्यात आले आहे.

सध्या बहुचर्चित असलेल्या सनबर्न फेस्टवलल कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होऊ द्यायचा नाही, असा ठाम निर्णय दोन्ही ग्रामपंचायतीच्या मंडळींनी घेतला आहे. परंतु दोन्ही गावच्या ग्रामस्थांचा विरोध असूनही यात शासन आणि प्रशासन जाणीवपूूर्वक दुर्लक्ष करत आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोन्ही ग्रामस्थांनी शेकडो एकर डोंगराचे सपाटीकरणाचे काम थांबविले. विरोध करण्यासाठी लवळे येथे विशेष ग्रामसभा झाली. पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरात विरोध झाल्याने बावधन व लवळे गावच्या सीमेवर सनबर्ग हा कार्यक्रम होत आहे. कंपनीने लवळे ग्रामपंचायतीकडे दिनांक 4 डिसेंबरला संगीतमय कार्यक्रम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. ग्रामपंचायतीने मिळालेल्या अर्जानुसार संगीतमय कार्यक्रम आहे म्हणून ना हरकत प्रमाणपत्र दिले.

ग्रामस्थांचा तीव्र विरोध
लवळे व बावधन गावच्या सीमेवर गुरुवार (दि. 28) ते रविवार (दि. 31) या कालावधीत होत असलेल्या ‘सनबर्न’ला विरोध करण्यासाठी बावधन आणि लवळे ग्रामस्थ एकवटले असून या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. यासाठी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थ कोणत्याही स्तराला जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा दोन्ही गावात आहे. सनबर्न’ हा कार्यक्रम ज्या परिसरात होणार आहे संरक्षण मंत्रालयाच्या एचईएमआरएल या कंपनीच्या 500 मीटर अतिसंवेदनशील भाग आहे. भारत सरकारच्या सरंक्षण खात्याची महाशक्तिशाली स्फोटके येथे तयार होतात. तेथे आयोजकांकडून फटाक्यांची आतशबाजी करण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रिक कामही होणार आहे त्यामुळे मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते याची जबाबदारी कोण घेणार. त्यामुळे या कार्यक्रमास परवानगी देऊ नये, असे यावेळी नगरसेवक किरण दगडे यांनी उपजिल्हाधिकारी यांना सांगितले.