‘सनबर्न’ दारुड्या संस्कृतीचा बाजार

0

संभाजी ब्रिगेडचा आरोप; फेस्टिव्हलला परवानगी नाकारण्याची मागणी

पुणे :‘सनबर्न’ फेस्टिव्हलला आता संभाजी ब्रिगेडनेदेखील आपला विरोध दर्शवला आहे. दोन वर्षांपासून पुण्यात होत असलेल्या या फेस्टिव्हलला हिंदू जनजागृती समिती विरोध करीत आली आहे. आता ‘सनबर्न’ हा दारुड्या संस्कृतीचा व अमली पदार्थांचा खुला बाजार आहे, असे म्हणत संभाजी ब्रिगेडकडून विरोध करण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून गोव्यात होणारा सनबर्न फेस्टिव्हल गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात होत आहे. सनबर्न फेस्टिव्हलला वेळेची मर्यादा नसते; मात्र शिवजयंती, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव कायद्याचा बडगा दाखवून रात्री 10 वाजता बंद केले जातात. ‘सनबर्न’ला आर्थिक गणिते बघून रात्रभर परवानगी दिली जाते. ‘सनबर्न’मध्ये रात्रभर अमली पदार्थांचे प्रचंड सेवन होते. याचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होतो. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. त्यामुळे येथे धर्मद्रोही उत्सव चालणार नाही, असे सांगत प्रशासनाने या फेस्टिव्हलला परवानगी नाकारावी, अशी मागणी ब्रिगेडने केली आहे.