जळगाव प्रतिनिधी । हिंदुत्ववाद्यांवरील अन्यायी कारवाई आणि सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, शिवसेना, बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेसमोरील पत्र्या हनुमान मंदिरापासून मोर्चास सुरुवात झाली. टॉवर चौक, नेहरू चौक, शिवतीर्थ मैदान, स्वातंत्र्य चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाची सांगता होऊन सभेत रुपांतर झाले. सनातनचे प्रचारक नंदकुमार जाधव यांनी सनातनवरील बंदीच्या या षडयंत्रात काँग्रेसचा पुढाकार असल्याचे सांगत या पक्षातील नेत्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने ही मागणी केली जात असल्याचे सांगितले. व्यक्तीदोषामुळे पूर्ण संस्थेला बदनाम करणे अयोग्य असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. आज मोकाट असणार्या नक्षलवादी, देशद्रोही विचारवंतांना हिंदू राष्ट्रात कारागृहात जावे लागेल, असा विश्वास प्रशांत जुवेकर यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष मुकेश महाराज पारगावकर, शिवसेनेचे गजानन मालपुरे, हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी मार्गदर्शन केले.