जळगाव। सनतान संस्थेच्या बंदीबाबत केंद्र शासनाने अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही. या पार्श्वभूमीवर अतिरेकी, हिंसक, राष्ट्रद्रोही व संविधानविरोधी कारवाया करणार्या या संघटनेवर बंदी घालण्याबाबत ठोस भूमिका राज्यशासनासह केंद्र शासनाने त्वरित घ्यावी, अन्यथा राज्यभरात जनआंदोलन हाती घेण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा ंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलून दाखविला.
निळू फुले फिल्म सर्कल उपक्रमास प्रारंभ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीवर्षाच्या समारोपाचा भाग म्हणून दलितेत्तर समुहापर्यंत आंबेडकरी विचार पोहोचावा म्हणून सहावे विचार संमेलन 24 सप्टेंबर रोजी जळगावी होणार आहे. शिक्षकांसाठीच्या वैज्ञानिक जाणीवा कार्यशाळा रद्द केल्याने शासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच सनातन संस्थेने समितीबाबत घेतलेल्या आक्षेपांना सविस्तर उत्तरे देत आरोप फोडून काढले. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे पुरोगामी कलावंत निळु फुले यांना आदरांजली म्हणून लोकप्रबोधनासाठी ‘निळू फुले फिल्स सर्कल’ हा नवा उपक्रम सुरू करुन दृकश्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर करुन संवाद वाढवून चळवळीचा विचार पोहोचविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. शहीद डॉ. दाभोळकर हत्त्येप्रकरणी संबंधितांविरुध्द कारवाईसाठी शासनाने कटीबध्द रहावे, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रीय लघुपट स्पर्धेेचे आयोजन
प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आटपाट निर्मिती संस्थेच्या सहकार्याने ‘विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा’ घेण्यात येणार असून ‘जातीप्रथा आणि त्यांच्या विविध समस्या’ हा विषय लघुपट स्पर्धेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. सदर स्पर्धा खुला गट, विद्यार्थी गट व कार्यकर्ता गट याकरिता असून विजेत्या लघुपटांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार व 5 हजार अशी पारितोषिके देऊन स्मृतिचिन्हासह सन्मानित करण्यात येणार आहे. 10 मिनिटांचे लघुपट, माहितीपट व अॅनिमेशनपट बनवून दि. 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान साधना मिडीया सेंटर शनिवारपेठ पुणे येथे पाठवावे. 20 जुलै ते 20 ऑगस्टदरम्यान राज्यभरात ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ हे युवा संकल्प मेळावे घेण्यात येणार असून राज्यकर्ते व प्रशासनाला जागे करण्यासाठी मानवी संवेदना अस्थिर करणार्या प्रश्नांवर ‘जवाब दो’ नावाने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.