पटना- बिग बॉसची माजी स्पर्धक आणि हरियाणाची डान्सर सपना चौधरी हिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. दरम्यान बिहारमधील बेगुसराय येथील त्यांच्या कार्यक्रमावेळी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री हा कार्यक्रम झाला. लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. अखेर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यादरम्यान एका व्यक्तिचा मृत्यू झाला.
सुदेश भोसले व हंसराज हंस यांच्यासह सपना या कार्यक्रमासाठी पोहोचली होती. मध्यरात्री १२ च्या सुमारास सपना स्टेजवर पोहोचली आणि गर्दीचा संयम सुटला.
सपनाला जवळून पाहण्यासाठी लोक स्टेजकडे धावत सुटले. यादरम्यान लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकणे सुरू केले. या कार्यक्रमासाठी ५० हजारांवर लोक पोहोचले होते. या गोंधळात सपनाने २ गाणी सादर केलीत. पण गर्दी अनियंत्रित झाल्याने आयोजकांना कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला. गर्दी जुमानत नाहीये, हे पाहून पोलिसांना लाठीमार करावा लागला.
कार्यक्रमादरम्यान झालेली चेंगराचेगरी आणि लाठीमारात डझनावर लोक जखमी झालेत तर एका व्यक्तिचा मृत्यू झाला. मृताचे नाव साजन कुमार असल्याचे कळते. तो बडिया येथे राहणारा आहे.