लखनऊ/नवी दिल्ली : बाप आणि मुलगा यांच्यातील संघर्षात अडकलेल्या समाजवादी पक्षात आता तडजोडी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून, मुख्यमंत्री अखिलेश यादव व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्यात झालेल्या बैठकीतही काही तोडगा निघू शकला नाही. दुसरीकडे, पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी मात्र दोन्ही नेत्यांत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच तोडगा निघेल असा आशावाद व्यक्त केला. तसेच, अखिलेश हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तथापि, पक्षाचे ‘सायकल‘ हे चिन्ह आपल्यालाच मिळावे यासाठी मंगळवारी अखिलेश यादव यांच्या गटाच्यावतीने निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यात आली. सोमवारी मुलायमसिंह यांनीही अशी भेट घेतली होती. या दोघांनीही एकाच चिन्हावर दावा केल्याने सर्वांच्या नजरा आता आयोगाच्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत.
मुलायमसिंह-अखिलेश यादव यांच्यात गुप्तगू!
दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध जोरदार दंड थोपाटले असले तरी, मुलायमसिंहांनी नरमाईची भूमिका घेत आपल्या गटाशी अंतर्गत चर्चा सुरु केली होती. दोन्ही गटांत समेट घडवून आणण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठनेते व मंत्री आझम खान दिल्लीत पोहोचले होते. परंतु, मुलायमसिंहांनी त्यांची भेट नाकारली व दिल्लीतून लखनऊ गाठले. तर लखनऊत अखिलेश यादव यांनी वडिल मुलायमसिंह यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांत एकांतामध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. परंतु, कोणताही तोडगा निघू शकला नाही. शिवपाल यादव हेदेखील या चर्चेत सहभागी झाले होते. सूत्राच्या माहितीनुसार, अखिलेश हे वडिलांसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्यास तयार आहेत. तथापि, तिकीट वाटपाचा पूर्ण अधिकार त्यांना हवा आहे. काका शिवपाल यादव यांना राष्ट्रीय राजकारणात पाठवले जाईल. मुलायमसिंह स्टार प्रचारक असतील व सर्व नेते निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करतील, असा तोडगा अखिलेश यादव यांनी सूचवलेला आहे.
बहुतांश आमदार अखिलेशच्या बाजूने
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावतीने रामगोपाल यादव यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावेळी त्यांनी आयोगाला सांगितले, की 90 टक्के आमदार आमच्यासोबत आहेत. तसेच, पक्षाचे 80 ते 90 टक्के सभासदही आमच्यासोबत आहेत. त्यामुळे अखिलेश यादव हे राष्ट्रीय अध्यक्ष असलेला समाजवादी पक्ष हाच खरा पक्ष आहे. त्यामुळे याच पक्षाला सायकल हे निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यात यावे. तसेच, मुलायमसिंह यांच्याशी अखिलेश यादव यांनी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर पक्षातील वाद संपुष्टात येईल, अशी प्रतिक्रिया पक्षाचे आमदार सुधीर सिंह यांनी दिली आहे.
मुलायमसिंह यांचा पक्ष कायदेशीररित्या बळकट
दरम्यान, निवडणूक आयोगाकडे मुलायमसिंह यादव यांचा पक्ष मजबूत आहे. कारण, पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन केवळ अध्यक्षच बोलावू शकतात. अखिलेश यादव व रामगोपाल यादव या काका-पुतण्याना पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांना अधिवेशन बोलविण्याचा अधिकार राहात नाही. सोमवारी मुलायमसिंह यादव यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन सायकल हे पक्षचिन्ह आपलेच असल्याचा दावा केला होता. मुलायम यांच्या गटात शिवपाल यादव, अमरसिंह, जया प्रदा, अंबिका चौधरी यांचा समावेश असून, बहुतांश आमदार व इतर पदाधिकारी मात्र अखिलेश यांच्या गटात आहेत. त्यामुळे पिता-पुत्राच्या यादवीत समाजवादी पक्ष पुर्णतः दुभंगलेला आहे.