पर्यायाची चाचपणी-आमदार राजूमामा भोळे
जळगाव– महापालिकेने नाशिक येथिल वाटरग्रेस कंपनीला दिलेला स्वच्छतेचा एकमुस्त मक्ता अवघ्या चार महिन्यातच रद्द करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडूस सुरु करण्यात आल्या आहेत. मुदत देवून देखिल मक्तेदाराच्या कामात सुधारणा होत नसल्याने नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे. यामुळे कुठल्याही कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाहीत तसेच पर्यांयांची देखील चाचपणी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहीती आमदार राजूमामा भोळे व महापौर सीमा भोळे यांनी दिली.
मक्तेदाराचे काम थांबविल्यास लगेचच महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण शहराची स्वच्छता करावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासन आता पर्यायांची चाचपणी करीत आहे. कामगार पुरविणार्या पुरवठादाराकडून सफाई कामगार घेवून स्वच्छता करता येईल का याची चाचपणी केली जात असल्याची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली. तसेच मक्ता रद्द केल्याने कुठल्या कायदेशीर अडचणी तर येणार नाहीत ना ? याची देखील खात्री करुन घेतली जात असल्याचे आमदार भोळे यांनी सांगीतले.
आमदार भोळे यांना घेराव
सोमवारी महानगरपालिकेतआमदार भोळे आले असता, मक्तेदारांच्या कामगारांनी त्यांना घेराव घालत मक्तेदाराने थकविलेल्या पगाराची मागणी केली. तसेच मक्तेदार किमान वेतनानुसार वेतन देत नसल्याची तक्रार देखील केली. साफसफाईचा ठेका रद्द करावा यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे अजय घेंगट यांनी निवेदन दिले.दरम्यान, आमदार भोळे यांनी उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांना बोलावून घेत त्यांना मक्तेदारास कर्मचार्यांच्या वेतनाबाबत नोटीस देण्याच्या सूचना केल्यात.