सफाई कर्मचार्‍यांचा उल्लेख जातीवाचक करू नये

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या सेवेत असणार्‍या सफाई कर्मचार्‍यांचा उल्लेख जातीवाचक करु नये, असा उल्लेख करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाचे तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सागर चरण यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद आहे की, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार महापालिका सेवेत सफाई काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा उल्लेख हा जातीवाचक करू नये, अशा सूचना केंद्र शासनातर्फे सर्वच स्थानिक संस्थांना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबईचे अध्यक्ष रामुजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. सफाई कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही, याचा अहवाल आयोगाच्या अध्यक्षांसमोर सादर केला. त्या बैठकीवेळी काही सफाई कर्मचार्‍यांचा उल्लेख जातीवाचक केल्याचे अ‍ॅड. सागर चरण यांच्या निदर्शनास आले. त्यावरून कोणत्याही सफाई कर्मचार्‍यांचा उल्लेख जातीवाचक करू नये, तसेच अशी गंभीर चूक करणार्‍या महापालिका अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. चरण यांनी केली आहे.