सफाई कर्मचार्‍यांना योजनांचा लाभ द्या

0

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार : फैजपूर पालिकेला भेट

फैजपूर : शासनाच्या धोरणानुसार शासकीय योजनांच्या लाभापासून सफाई कामगार वंचित राहू नये याची काळजी घ्यावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी जळगांव जिल्हा दौर्‍यावर असतांना फैजपूरात सफाई कर्मचार्‍यांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासनाला दिल्या. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार हे 11 ते 21 डिसेंबर 2019 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता फैजपूर नगरपालिका मुख्याधिकार्‍यांसमवेत सफाई कर्मचारी यांच्या समस्यांबाबत बैठक घेतली.

लोकसंख्येच्या आधारावर व्हावी कर्मचारी नियुक्ती
रामुजी पवार म्हणाले की, सफाई कर्मचारी यांच्यासाठी शासनाच्या धोरणानुसार घालून दिलेल्या विविध योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. शहराच्या लोकसंख्येच्या आधारावर निकषाप्रमाणे सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, लाड समितीच्या शिफारशीनुसार सेवानिवृत्त किंवा मयत सफाई कामगारांच्या जागांवर शासन धोरणांनुसार त्यांच्या वारसांना सामावून घेणे, त्यानंतर सफाई कर्मचार्‍यांना लागणारे साहित्य व गणवेश वाटप करणे तसेच सफाई कर्मचारी यांच्या शिक्षण गुणवत्तेनुसार त्यांना पदोन्नती देणे, सफाई कर्मचार्‍यांना त्यांच्या मालकी हक्काची निवास स्थाने बांधून देणे, पालिकेच्या व्यापारी संकुलमध्ये अनुसूचित जाती जमाती राखीव असलेल्या पाच टक्के दुकानांपैकी एक टक्के दुकाने सफाई कर्मचार्‍यांच्या मुलांना व्यापार उद्योगासाठी देणे यासह त्यांच्या प्रश्नावलीवरील 13 विषयानुसार सफाई कर्मचारी यांना लाभ मिळावा अशा सूचना त्यांनी केल्या. सफाई कर्मचारी यांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी सहकार्य करा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे, नगरसेवक हेमराज चौधरी, प्रभाकर सपकाळे, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष दिलीप चांगरे, अखिल भारतीय सफाई मजदूरचे महासचिव जितेंद्र चांगरे, सुनील पवार, अनिता खरारे, वासुदेव खरारे आदी उपस्थित होते. यावेळी रामुजी पवार यांनी सफाई कर्मचारी यांच्या समस्या व अडीअडचणी समजून घेतल्या. आभार पाणीपुरवठा विभागाचे अभियंता विपुल साळुंखे यांनी मानले. या बैठकीला सफाई कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.