मुंबई : मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात एका सफाई कर्मचार्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. कर्मचार्याची प्रकृती इतकी बिकट असतानाही या कर्मचार्याची काळजी घेण्यात आली नाही. शिवाय त्यावेळी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयातील सफाई कर्मचार्यांनी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध तीव्र निदर्शने केली.
विश्वनाथ मोरे (38) असे या मृत कर्मचार्याचे नाव असून ते मालाड येथील एका चाळीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई असा परिवार आहे. गेली 15 वर्षे मोरे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे कामावर आल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. प्रकृती ठिक वाटत नसल्याने त्यांनी रुग्णालयातील बाहृयरुग्ण विभागात वैद्यकीय तपासणी केली. रुग्णालयात उपस्थित निवासी डॉक्टरने ईसीजी केल्यानंतर हृदयाच्या ठोक्यात फरक दिसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, प्रकृती बिकट असून जीवावर बेतू शकते, याची कल्पना त्यांना देण्यात आली नाही.
सर्वसाधारण वॉर्डमध्ये ठेवले
इतकेच नाहीतर अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये खाटा रिकाम्या असताना मोरे यांना सर्वसाधारण वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. अचानक बोलत-चालत असतानाच मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यामुळे जागीच कोसळून त्यांचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार घडला त्यावेळी रुग्णालयात एकही तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नव्हते. हा मृत्यू रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे, असा आरोप कर्मचार्यांनी केला आहे.
सफाई कर्मचार्यांची 80 पदे रिक्त
या रुग्णालयात सध्या चतुर्थ श्रेणी वर्गातील 425 सफाई कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. तर 80 कर्मचार्यांची पदे अद्यापही रिक्तच आहेत. ही पदे भरण्यासाठी अजून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णालयात कार्यरत कर्मचार्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली. तरीही पदे भरण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.