सफाई कामगारांकडे संरक्षक साहित्याचा अभाव

0

जळगाव। महानगरपालिकेने सन 2011 ते 12 या कालावधीत भंडार विभागाद्वारे आरोग्य विभागासाठी 260 लहान लोखंडी हातगाड्या शहरातील संकुलातील कचरा उचलण्यासाठी खरेदी केलेल्या आहेत. मात्र, या हातगाड्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांकडे आढळत नसून कचरा उचलून कचरा कुंडी किंवा टॅक्ट्ररकडे वाहून नेण्यासाठी चक्क गोणपाटला दोरी बांधून सफाई कर्मचारी कचरा ओढतांना दिसतात. तर खरेदी केलेल्या सर्व 260 हातगाड्या गेल्या कुठे असा प्रश्‍न शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.

आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांचे साहित्य गेले कुठे?
आरोग्य विभागाला वेळोवेळी साहित्य पुरविण्यात आले आहे. मात्र, हे साहित्य तसेच सर्व 260 हातगाड्या कुठे गेल्या आहेत याची सखोल चौकशी करावी अशी मागणी संघटनेचे कॉ. अनिल नाटेकर यांनी केली आहे. सफाई कर्मचार्‍यांच्या आरोग्याचे संरक्षणासाठी आरोग्य विभागातर्फे संरक्षक साहित्य देणे बंधनकारक आहे. परंतु, आरोग्य विभाग असे कोणत्याही प्रकारचे साहित्य देत नसल्याचे दिसून येत असल्याचे तक्रार केली आहे. गमबूट, हातमोजे, साबण, मास्क आदी साहित्य आरोग्य विभाग सफाई कर्मचार्‍यांना देत नसून ही बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. तरी हे साहित्य कुठे गेले आहे याची विभागनिहाय चौकशीची मागणी नाटेकर यांनी केली आहे.