सफाई कामगारांचे ठेकेदाराविरोधात सोमवारपासून तीव्र आंदोलन

0

तीन महिन्यांपासून पगार नसल्याने आक्रमक पावित्रा ; वेतन मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा

जळगाव- महापालिकेने दैनंदिन स्वच्छता व कचरा संकलनाचा 75 कोटीचा पाच वर्षासाठी ठेका दिलेल्या नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीने तीन महिन्यांपासून पगार दिले नसल्याने सफाई कर्मचारी आक्रमक झाले आहेत. काम बंद आंदोलनानंतर आता 375 कामगार ठेकेदाराविरोधात जो पर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती मिळाली आहे. याचा एक भाग म्हणून सोमवारी कामगार महापालिकेसमोर कंपनीने दिलेल्या जॅकेटची होळी करणार असून मक्तेदाराविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे, अशी माहिती सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी दिली आहे.

स्वच्छतेअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात
काही दिवसापूर्वी घंटागाड्यावरील कर्मचार्‍यांनी एक दिवस काम बंद आंदोलन तसेच एका कर्मचार्‍याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात अडिच महिन्यापासून पगार मिळत नसल्याने सफाई कर्मचार्‍यांनी दोन दिवसापासून काम बंद आंदोलन अखिल भारतीय मजदुर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांच्या नेतृत्वाखाली पूकारले आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता होत नसल्याने अनेक ठिकाणी कचरा साचलेला तर गटार कामगार संपावर असल्याने गटारी तुंबल्याने शहरातील अनेक भागात डास, दुर्गंधीचे प्रमाण वाढून साथरोगांचे आजार पसरू लागले आहे. शहरात गेल्या तीन-चार दिवसापासून सफाई व गटारी काढल्या जात नसल्याने साथरोगांचे आजाराचें प्रमाण वाढले आहे. अशाप्रकारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महापालिकेने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

375 कर्मचार्‍यांचा आंदोलनात सहभाग
भारतीय मजदुर संघातर्फे पुकारलेल्य आंदोलनात मक्तेदाराकडील सफाई व गटार स्वच्छतेचे काम गरणारे सुमारे 375 कर्मचारी पगार मिळत नसल्याने संपावर गेले आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात कचरा साचलेला असून स्वच्छता होत नसल्याने अस्वच्छता पसरली आहे. तसेच गटारी देखील स्वच्छ होत नसल्याने गटारी कचर्‍याने तुंबून सांडपाणी रस्त्यांवर वाहत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहवयास मिळत आहे.

सोमवारी कंपनीच्या जॅकेटची होळी !

गेल्या तीनचार दिवसापासून काम बंद आंदोलन वॉटर ग्रेसच्या सफाई कामगारांनी सुरू केले आहे. पगाराचा प्रश्‍न दोन दिवसात जर मक्तेदाराने मार्गी लावला नाही तर कंपनीने दिलेल्या जॅकेटची होळी सफाई संघटनेतर्फे केली जाणार आहे. त्यानुसार सोमवारी सफाई कामगार कंपनीने दिलेले जॅकीटची होळी महापालिकेच्या समोर करून पोलिस ठाण्यात मक्तेदारा विरुध्द तक्रार दाखल करणार असा सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घेंगट यांनी बोलतांना सांगितले.