सफाई प्रमाणपत्र बंधनकारक

0

भिवंडी । भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांना स्वच्छता गटनिहाय महिनाभर समाधानकारक काम केल्याचे प्रमाणपत्र स्थानिक नगरसेवकाने दिल्यानंतरच कर्मचार्‍यांना वेतन अदा करण्यात येईल, असा आदेश भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी काढला आहे. महानगरपालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन अध्यक्ष महेंद्र कुंभारे यांनी आयुक्तांकडे निवेदन सादर करून केली आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका हद्दीत घंटागाडीतून कचरा वाहून नेणार्‍या फेर्‍या कमी होत असल्याने अस्वच्छतेत वाढ होत आहे. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कर्मचार्‍यांना नगरसेवकांच्या आहारी जाण्यास भाग पडू नये म्हणून निर्णयाचा फेरविचार केला जावा अशी विनंती यांनी केली आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नगरसेवक प्रमाणपत्र सक्तीमुळे सफाई कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र त्यावर कोणताही पालिकेचा अधिकारी बोलण्यास तयार नाही.

अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापुढे स्वच्छता कर्मचार्‍यांना नगरसेवकांच्या घरात भांडी घासणे, झाडलोट करणे, कपडे धुणे, भाजी आणणे आदी कामांबरोबर आणखीन काय-काय करायला लावतील याचा नेम नाही. नगरसेवकांच्या इशार्‍यावर नाचणे आणि सांगितलेली कामे करणे याशिवाय कर्मचार्‍यांसमोर दुसरा पर्याय नाही. कारण नगरसेवकांच्या मर्जीनुसार कर्मचार्‍यांनी कामे न केल्यास नगरसेवक त्यांना प्रमाणपत्र देणार नाही. आणि आदेशात नमूद केल्याप्रमाणे त्यांना वेतन दिले जाणार नाही. नगरसेवकांच्या स्वीय सहाय्यकांमुळे आरोग्य विभागातील कर्मचारी हैराण झालेले आहेतच. आता त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

न्यायासाठी कामगार संघटना झाल्या आक्रमक
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्वच्छता राखण्याची संपूर्ण जबाबदारी आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांची आहे. ती पूर्ण करता येत नसेल तर त्यास आरोग्य निरीक्षक व मुकादम हेच जबाबदार आहेत. या दोघांची हप्तेबाजीची कार्यपद्धती असल्यामुळेच शहरात अस्वच्छता पसरली असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आरोग्य निरीक्षक व मुकादम यांच्याकडून स्वच्छता होत नसेल तर त्यांच्या नेमणुका रद्द करून हजेरी घेण्याचे कामही नगरसेवकांच्या हाती द्यावे असाही टोला मारला. विरोधकांच्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक साफसफाई करू देणार नाही आणि अस्वच्छतेला मात्र कर्मचारी यांना जबाबदार धरले जाईल.

आयुक्तांनी घेतलेला निर्णय घातकी
महापालिकेच्या आस्थापनेवर आरोग्य विभागात 2470 कर्मचारी आहेत. दोन्ही बाजूने कर्मचारी कात्रीत सापडला असून वेतनाअभावी कुटूंबियांची उपासमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही युनियन अध्यक्ष यांचे म्हणणे आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतलेला निर्णय हा घातकी असून स्वाभिमानी कर्मचार्‍यांच्या मनाला ठेच पोहोचविणारा आहे. यासाठी एकूण आदेशातील तीन मुद्दयांपैकी पहिला मुद्दा सोडला तर दुसरा व तिसरा मुद्दा याबाबत नगरसेवकांचे प्रमाणपत्र घेण्यास युनियनचे काहीही म्हणणे नाही.