महापौर, उपमहापौर, सभापतींसह नगरसेवकांनी केली प्रभागांमध्ये पाहणी; अनेक कर्मचारी गैरहजर
जळगाव : सफाई मक्तेदाराच्या कामगारांनी गेल्या तीन दिवसांपासून कामबंद केल्यामुळे जळगाव शहरात स्वच्छतेचा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंगळवारी प्रभारी आयुक्तांनी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेवून मनपाच्या कायम कर्मचार्यांच्या माध्यमातून साफसफाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला.मात्र बुधवारी सकाळी महापौर,उपमहापौर आणि स्थायी सभापती यांनी पाहणी केली असता अनेक कर्मचारी गैरहजर आढळून आले तर काही कर्मचारी उशिरा आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकार्यांनी कर्मचार्यांना धारेवर धरले. यावेळी हजेरी देखील तपासली.
वॉटरग्रेस कंपनीकडून सोमवारपासून शहरातील साफसफाईचे काम बंद केल्याने शहरात कचराकोंडी झाली आहे. त्यामुळे कायम कर्मचार्यांच्या माध्यमातून स्वच्छता केली जात आहे. सकाळी 6 वाजता पदाधिकार्यांनी अचानक केलेल्या पाहणीमुळे मनपा सफाई कर्मचार्यांची धावपळ उडाली. यावेळी गैहजर, नेहमी गैहजर तसेच रजेवर असलेल्या कर्मचार्यांच्या नोंदी घेत आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर भारती सोनवणे यांच्यासह उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, आरोग्यधिकारी डॉ.विकास पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत यांच्यासह मनपा आरोग्य विभागातील आरोग्य अधिक्षक व निरीक्षक उपस्थित होते.
हलगर्जीपणा केल्यास कारवाई
जळगाव शहर महापालिका आरोग्य विभाग निरीक्षक कार्यालय युनिट क्र.2, दोन वार्ड 2 येथे 35 पैकी केवळ 8 कर्मचारी हजर होते. तसेच युनिट क्रमांक 7 मध्ये 64 कर्मचार्यांपैकी 27 कर्मचारी हजर होते. तर 37 कर्मचारी गैहजर होते. तांबापूर भागातील युनिट क्रमांक 10 मध्ये 37 कर्मचार्यांपैकी 17 कर्मचारी गैहजर होते. तसेच बालगंधर्व भागासह अन्य ठिकाणीही वेळेवर न येणाच्या कर्मचार्यांची तोंडओळख करण्यात आली. यावेळी वेळेवर उपस्थित न राहणार्या कर्मचार्यांना पदाधिकार्यांनी चांगलेच धारेवर धरले. तसेच कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल अशी तंबी देखील यावेळी देण्यात आली. काही प्रभागात कर्मचारी दिसून आले मात्र काही प्रभागात एकही कर्मचारी दिसून आले नाही. मंगळवारी हरिविठ्ठलनगरचा बाजार होता. मात्र बुधवारी एकही कर्मचारी न आल्याने प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे.